नाशिक – उन्हाळ्यात चेहऱ्यावर घामाच्या धारा सुरू होतात. उन्हाळ्यात पालकांची समस्या वेगळीच. त्यांच्या चेहऱ्यावर उन्हाळी सुट्टीमुळे आढ्या निर्माण होतात. सध्या समाज माध्यमांचा प्रभाव असल्याने मुलांच्या हातातील भ्रमणध्वनी दूर कसा करावा, असा प्रश्न पालकांपुढे आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले घरातच राहणार, हा विचारच पालकांना घाम फोडत आहे. समाज माध्यमांचा वाढता विळखा, ऑनलाईन खेळाचा वाढलेला वापर, यामुळे शिबीर, संस्कार वर्गापेक्षा पालकांकडून बालकांना वाचन संस्कृतीकडे वळविण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रयत्नांना संमिश्र प्रतिसाद लाभत आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत बालक आणि त्यांच्या पालकांकडून बाहेर फिरण्याचे नियोजन होत असते. काहींकडून बालकांसाठी संस्कार वर्ग, पोहण्याचे वर्ग, उन्हाळी शिबीर यासह वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी होते. परंतु, वेळ थोडा असतो. या कमी वेळेचा फायदा घेत बालकांकडून पालकांच्या हातातील भ्रमणध्वनी, टॅब, लॅपटाॅप अशा वेगवेगळ्या साधनांव्दारे, आभासी माध्यमातून मनोरंजन विश्वात प्रवेश करण्यात येत आहे. काहींकडून त्यासाठी आधीच नवीन काही खेळ भ्रमणध्वनीत टाकण्यात आले आहेत. कार्टुन मालिकांसह अन्य काही मनोरंजक कार्यक्रम संकलित करण्यात येत आहेत. यामुळे मुलांच्या हातातील भ्रमणध्वनी काढायचा कसा, यासाठी जवळच्या वाचनालयात बाल वाचकांसाठी पालकांकडून नोंदणी करण्यात येत आहे.
याविषयी पालकांपैकी अनुजा पंत यांनी भूमिका मांडली. मुलांना सुट्टी लागताच दोघांचे वाद सुरू झाले. कधी भ्रमणध्वनी तर कधी टीव्हीच्या रिमोटवरून. यामुळे आपण बाल वाचनालयाचा पर्याय निवडल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक वाचनालयाचे संजय करंजकर यांनी, बाल वाचनालयाकडे बालकांची पाऊले पडत असून गोष्टीरुप, कादंबरी, विज्ञानविषयक पुस्तकांना मागणी होत असल्याचे सांगितले. सर्वात्मका वाचनालयाचे अविनाश टिळे यांनी, बालकांसाठी भरपूर पुस्तके असले तरी बालक वाचकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. ठराविकच मुले वाचनालयात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
साक्षात्कारी दत्त मंदिरातील वाचनालयाच्या वतीने बालकांनी वाचनाकडे वळावे, यासाठी वेगळीच शक्कल आखण्यात आली. मुले जी पुस्तके वाचतात, त्यांच्याविषयी दर १५ दिवसांनी स्पर्धा घेतली जाते. त्या पुस्तकांत काय वाचले, याची माहिती देण्यासाठी सांगितले जाते. जे खरोखर वाचतात ते बोलतात. त्यातील काही निवडक मुलांना गौरविण्यात येते. याशिवाय, काही वेगवेगळ्या योजनाही राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.