नाशिक : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही धरणे तुडुंब होण्याच्या मार्गावर असून अनेक नद्या-नाल्यांना पूर आला आहे. रविवारी दुपारी गोदापात्रात पूजन करताना महावितरणचा अभियंता पाय घसरून पाण्यात वाहून गेला. सुरगाणा तालुक्यात नदीच्या पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सकाळी काठालगत आढळला. इगतपुरी तालुक्यातील भाम धरणातून सोडलेले पाणी काळुस्ते गावातील घरांमध्ये शिरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पाच ते सहा कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे लागले. सुरगाणा, देवळा, त्र्यंबकेश्वर तालुक्यांत घरांची पडझड झाली. काही ठिकाणी पशूधनाचे नुकसान झाले.
शनिवारी चाललेल्या संततधारेने रात्रीपासून मुसळधार स्वरुप धारण केले. मागील २४ तासांत सुरगाणा (८८ मिलिमीटर), इगतपुरी (५६), पेठ (९८), त्र्यंबकेश्वर (५९) मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या एकाच दिवशी जिल्ह्यात सरासरीच्या २०.२ मिलिमीटर पाऊस झाला. रविवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक कोंडी झाली. गंगापूरमधील विसर्गामुळे गोदावरीची पातळी उंचावली आहे. दुपारी ओझर येथील यग्नेश पवार (२९) हे कुटुंबियांसमवेत पूजाविधीसाठी रामकुंड परिसरात आले होते. नदीत पूजन करत असताना पाय घसरून ते वाहून गेले. जीवरक्षकांकडून बुडालेल्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. पवार हे महावितरण कंपनीत भुसावळ येथे अभियंता पदावर कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशीच एक घटना सुरगाणा तालुक्यात घडली. चिंचदा येथील मंगला बागूल या रात्री नदी पार करत असताना अचानक पाण्याचा लोंढा वाढल्याने त्या वाहून गेल्या. त्यांचा मृतदेह सकाळी नदीकाठावर आढळल्याची माहिती प्रशासनाने दिली.
अनेक घरांची पडझड
भाम धरणातील विसर्गामुळे इगतपुरी तालुक्यातील काकुस्ते येथील अनेक घरांमध्ये नदी-नाल्याचे पाणी शिरले. खबरदारीचा उपाय म्हणून २० ते २२ लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यात आले. कानडवाडी येथे भीमा पडवळे यांच्या घराची भिंत कोसळली. या घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नाही. बोर्ली येथे लक्ष्मण भले यांच्या घराची भिंत व कौलारू घराची एक बाजू पडली. देवळा तालुक्यातील वरवंडी येथे लताबाई जाधव यांचे घर जमीनदोस्त झाले. सुरगाणा तालुक्यात पाच घरांचे अंशत: नुकसान झाले असून एक बैल मयत झाला. भुसणी येथेही एका घराची भिंत पडली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आळवंड येथील शारजाबाई देहाडे यांच्या घराची भिंत कोसळली.