नाशिक : बनावट (मॉर्फ) चित्रफिती प्रसारित करण्याची धमकी देत २० कोटींच्या खंडणीची मागणी करत आजवर तब्बल एक कोटी पाच लाख रुपये उकळणाऱ्या संशयित महिलेसह तिच्या मुलाला १० लाखाची खंडणी स्वीकारताना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. तक्रारदार अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ न्यासात विश्वस्त मंडळावर आहे. संशयित महिला कृषी विभागात अधिकारी असून स्वामी समर्थ केंद्रात उपासिका आहे. कळवण, सटाणा, मालेगाव, देवळासह सिडकोतील अनेक केंद्राच्या व्यवस्थापनाची जबाबदारी तिच्याकडे होती. पैसे दुप्पट करून देण्याच्या नावाखाली संशयित महिलेने केंद्रातील सेवेकऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचे सांगितले जाते. संशयिताच्या घरातून १० लाखाची रोकड, लॅपटॉप, महागडे तीन भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले आहेत.
या कारवाईची माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासंदर्भात निंबा शिरसाट (रा. देवळा, सध्या गंगापूर रोड) यांनी तक्रार दिली. त्यांच्याकडून १० लाख रुपये खंडणी स्वीकारताना संशयित महिला सारिका उर्फ सारिखा सोनवणे (४२) आणि तिचा मुलगा मोहित सोनवणे (२५) यांना अटक करण्यात आली आहे. शिरसाट आणि संशयित महिलेचा परिचय स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्राच्या माध्यमातून झाला होता. तक्रारदार शिरसाट हे अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ या न्यासाच्या विश्वस्त मंडळावर कार्यकारी सदस्य आहेत. उपासिका असणाऱ्या संशयित महिलेकडे २०२४-१५ मध्ये सिडकोतील स्वामी समर्थ केंद्रांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी होती. या काळात उभयतांमध्ये परिचय झाला. तक्रारदार आणि संशयित दोघेही देवळा तालुक्यातील रहिवासी आहेत. महिलेने कसमादे परिसरातील स्वामी समर्थ केंद्रांची जबाबदारी देण्याचा आग्रह धरला. तेव्हा कसमादे परिसरातील ४० ते ४५ सेवा केंद्रांचीही जबाबदारी त्यांना देण्यात आली होती.
हेही वाचा : नाशिक : विजेच्या धक्क्याने बालिकेचा मृत्यू
मागील चार ते पाच वर्षात संशयितांनी तक्रारदारांकडून पैसे उकळले. बनावट चित्रफित प्रसारित करण्याची धमकी देत २० कोटींची खंडणी मागितली. एक कोटीहून अधिकची रक्कम देऊनही त्यांच्याकडून धमकावण्याचे सत्र सुरू राहिले. या त्रासाला वैतागून शिरसाट यांनी अखेर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी सापळा रचून संशयित महिला सारिका सोनवणे आणि मुलगा मोहित या दोघांना १० लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना रंगेहात पकडले. दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुध्द खंडणीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : वीर जवान विनोद पाटील यांना अखेरची मानवंदना, जळगाव जिल्ह्यातील हजारोंची उपस्थिती
पैसे कसे उकळले ?
२०१८-१९ या काळात संशयित महिलेच्या पतीचे निधन झाले. पतीचे निधन, आजारपण, शेती व लहान मुलाची जबाबदारी आदी कारणे देऊन २५ लाख रुपये उधार घेतले. पुढे स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी संकल्प सिध्दी नावाची कंपनी स्थापून सेवेकऱ्यांकडून पैसे उकळल्याचे उघड झाले. जानेवारी २०२२ मध्ये संशयितांनी शिरसाट यांना गंगापूर रस्ता भागात बोलावले. मुलगा माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ असून बनावट चित्रफिती (मॉर्फ) प्रसारित करण्याची धमकी शिरसाट यांना दिली. व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधून पैसे मागण्यास सुरुवात केली. जानेवारी २०२३ मध्ये संशयित प्रशांतनगर येथील स्वामी समर्थ केंद्रात भेटले. भ्रमणध्वनीतील चित्रफिती दाखवत २० कोटींची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. शिरसाट यांनी घाबरून उधार, उसनवारीतून ५० लाख जमवले. गंगापूर रस्त्यावरील जेहान चौकात नोव्हेंबर २०२३ मध्ये ही रक्कम संशयितांना दिली. तेव्हा संशयितांनी भ्रमणध्वनीतील चित्रफिती नष्ट केल्याचे दर्शविले. परंतु, नंतर पुन्हा १० कोटी, ५० लाखाची मागणी करुन धमकावणे सुरुच ठेवले.
हेही वाचा : जळगावात ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासह पाच जणांविरुद्ध खंडणीप्रकरणी गुन्हा
सेवेकऱ्यांचीही फसवणूक
संशयित सारिका सोनवणे हिने संकल्प सिध्दी नावाची कंपनी स्थापन केली. स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकऱ्यांना गुंतवणूक दुप्पट करून देण्याचे अमिष दाखवले. संबंधितांकडून पैसे गोळा केले. जमा केलेली रक्कम संबंधितांना परत केली नसल्याच्या तक्रारी झाल्या. सेवेकऱ्यांचे पैसे परत करण्यासाठी संशयित महिलेने तक्रारदाराकडे वेळोवेळी पैश्यांची मागणी केली. तेव्हा मदत म्हणून आपण २० लाख रुपये दिल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.