नाशिक: महायुतीच्या दिंडोरी, नाशिक आणि धुळे लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीच्चा आवारात होणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. कांदा प्रश्नावरुन जाब विचारण्याची तयारी करणाऱ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करुन संबंधितांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे, कांदा उत्पादक संघटनेसह शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. आंदोलन केल्यास संबंधितांना जबाबदार धरण्याची तंबी देण्यात आली असून सभेमुळे दोन दिवस पिंपळगाव बाजार समितीतील कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत.
देशात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन होणाऱ्या नाशिक जिल्ह्यात पंतप्रधान मोदी यांची बुधवारी दुपारी एक वाजता सभा होत आहे. जवळपास पाच महिने लागू असणारी कांदा निर्यात बंदी काही दिवसांपूर्वी सशर्त शिथील करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कांदा निर्यात बंदीमुळे झालेले नुकसान हा कळीचा मुद्दा ठरला आहे. पंतप्रधानांची सभा सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामीण भागाऐवजी नाशिक शहरात घ्यावी, असा पर्याय आधी सुचवला गेला होता. तथापि, तो अमान्य करीत ग्रामीण भागातील कांद्याचे लिलाव होणाऱ्या पिंपळगाव बाजार समितीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेप्रसंगी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नाशिक ग्रामीण आणि शहर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. सभास्थळी काळे कपडे परिधान करून वा कांदा घेऊन कुणी प्रवेश करणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा : तेजस गर्गे अद्यापही फरार, लाच प्रकरणातील संशयित
मंगळवारी महाविकास आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांनी ‘कांद्याने केला वांदा, चला मोदींना जाब विचारुया‘ असा संदेश समाजमाध्यमांत प्रसारित केल्याने कार्यकर्त्यांची धरपकड करीत त्यांना नजरकैदेत ठेवल्याचे सांगितले जाते. शेतकरी संघटनांकडून आंदोलनाची शक्यता लक्षात घेत कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांसह अनेकांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावल्या. पंतप्रधानांच्या दौऱ्यात आपण आंदोलन करू नये. आपल्या हस्तकामार्फत आंदोलन झाल्यास तुम्हाला सर्वस्वी जबाबदार धरले जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.