नाशिक: शतपावली करताना दुचाकीवरुन आलेल्या भामट्यांनी मंगळसूत्र खेचल्याने निराश झालेल्या महिलेला महानगर पालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणामुळे सुखद धक्का बसला. सफाई कर्मचाऱ्याने त्यांना सापडलेले तुटलेले मंगळसूत्र प्रामाणिकपणे पंचवटी पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रामाणिकपणाबद्दाल संबंधित महिला कर्मचाऱ्याचा पंचवटी पोलिसांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : जळगाव : उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कारानंतर दुसऱ्याच दिवशी हवालदार सापळ्यात

चित्रा वडनेरे या तपोवन कॉर्नर परिसरात २१ जुलैच्या रात्री पतीसमवेत शतपावली करत असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी वडनेरे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून नेले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना महापालिकेच्या सफाई कर्मचारी अर्चना गांगुर्डे या तपोवन कॉर्नर परिसरात सफाई करत असताना त्यांना तुटलेले मंगळसुत्र सापडले. अर्चना यांनी प्रामाणिकपणे हे मंगळसूत्र पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले. गुरूवारी पंचवटीचे पोलीस निरीक्षक मधुकर कड, निरीक्षक सुशील जुमडे, ज्योती आमणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देवून गांगुर्डे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे विभाग संचालक डॉ. आवेश पलोड, संजय दराडे, विभागीय स्वच्छता निरीक्षक राकेश साबळे यांनीही गांगुर्डे यांचा सत्कार केला. याशिवाय ज्यांचे मंगळसूत्र होते, त्या वडनेरे यांनीही गांगुर्डे यांचा सत्कार केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik female cleaner who found mangalsutra handed over to police css