नाशिक : पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येत नसल्याने शहरात गुन्हेगारी वाढतच आहे. पंचवटीत गुन्हेगारीच्या घटना सातत्याने होत असून टोळ्यांमध्ये हाणामाऱ्या होत आहेत. रविवारी दोन गटात वर्चस्ववादातून हवेत गोळीबार करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांच्या दृष्टीने मात्र किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. एकीकडे राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार नागरिकांशी संवाद तसेच वेगवेगळ्या उपक्रमांची प्रसिध्दी करण्यात अडकलेला पोलीस विभाग गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी कठोर कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलिसांवरील हल्ले, तडीपार गुंडाकडून खंडणीसाठी गोळीबाराची धमकी, वाहन जाळपोळ, किरकोळ वादातून चाकू किंवा कोयते बाहेर काढणे, वाहन चोरी, भाविकांची लूट यासारख्या घटना सातत्याने घडत आहेत. पंचवटीत हवेत गोळीबार करत समाजकंटकांनी पोलिसांना आव्हान देत नागरिकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. पंचवटीत गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत आहे. पंचवटी परिसरात गणेशवाडी आणि हिरावाडी परिसरातील दोन गटांमध्ये रविवारी वाद झाले. धारदार शस्त्रे, काेयत्यांचा वापर हल्ल्यात करण्यात आला. या हल्ल्यात काही गंभीर जखमी झाले. एका गटाकडून हवेत गोळीबार करण्यात आला. या प्रकाराने परिसरातील रहिवासी कमालीचे भयभीत झाले. परंतु, रविवारी रात्री उशीरापर्यंत याविषयी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

हिरावाडी परिसरातील नागरिकांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करुन सूत्रधाराला ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली आहे. अवैध व्यवसाय, खंडणी, हल्ले अशा प्रकारांमध्ये माजी नगरसेवकाच्या पतीचा तसेच सराईत गुन्हेगारांचा असणारा सहभाग पाहता रहिवासी तक्रार देण्यासाठी धजावत नसल्याने पोलिसांनीच पुढाकार घेत संशयितांविरुध्द गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, किरकोळ वादातून हाणामारीचा प्रकार घडला असून सर्वकाही व्यवस्थित असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.\

पंचवटी परिसरात दोन गट समोरासमोर आल्यावर हवेत गोळीबार झाला. खेळताना बॅट हिसकावण्यावरून वाद झाला होता. या वादाची पार्श्वभूमी या गोळीबाराला आहे. सोमवारी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासी पथके तैनात करण्यात आली आहेत. अद्याप कोणाला अटक नाही. संशयितांची नावे लवकरच जाहीर करण्यात येतील.

मधुकर कड (वरिष्ठ निरीक्षक, पंचवटी पोलीस ठाणे)

Story img Loader