नाशिक : नाशिकरोड परिसरात खेळताना उघड्या रोहित्राशी स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे शहर परिसरातील उघड्या रोहित्रांची समस्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
हेही वाचा : नाशिक : सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या
आफ्फान खान (रा. सुभाषरोड) याची आई नाशिकरोड परिसरातील एका गोदामात बारदान, पोती शिवण्याचे काम करते. सोमवारी त्या नेहमीप्रमाणे कामावर गेल्या असता आफ्फानही त्यांच्याबरोबर होता. आई कामात गुंतल्यानंतर आफ्फान बाहेर खेळायला गेला. खेळताना त्याचा हात उघड्या रोहित्राला लागला. त्याला विजेचा धक्का बसला. परिसरातील नागरिकांनी त्याला जवळच्या बिटको रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. बालकाच्या कुटूंबियांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.