नाशिक : फोनवर शिवीगाळ केल्याच्या कारणावरून टोळक्याने चार मुलांना शेडमध्ये डांबून प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण केली. नाशिक शहरातील अमरधाम भागात ही घटना घडली. या मारहाणीत दोन अल्पवयीन मुले जखमी झाले. डांबलेल्या मुलांची पोलिसांनी सुटका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत पोलीस अंमलदार विशाल वाघ यांनी तक्रार दिली. सागर कुमावत, ऋषी पगारे (दोघे रा. शितळादेवी मंदिराजवळ, अमरधाम रस्ता) आणि शेखर जगताप (मोदकेश्वर वसाहत, काझी गढी, जुने नाशिक) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयित शेखर जगतापला ओम पवार (१४, चित्रघंटा, जुने नाशिक) आणि सोनू चुनाडी (१४, विसपुते वाडा, शनी चौक) यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधत शिवीगाळ केली होती. या वादातून ही घटना घडली. संशयितांनी संगनमताने मंगळवारी रात्री ओम पवार आणि सोनू चुनाडी यांना अमरधाम भागात वाद मिटविण्यासाठी बोलावले. यावेळी दोघांबरोबर सौरभ पोद्दार (१९, मोदकेश्वर वसाहत, काझीगढी) आणि कृष्णा चव्हाण (२१, देवी मंदिराजवळ, चव्हाटा) हे दोघे मित्रही गेले होते. संशयितांनी त्यांना लिंगायत समाजाच्या स्मशानभूमी परिसरात नेले. सुरक्षा रक्षकांसाठीच्या पत्र्याच्या शेडमध्ये चौघांना प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण केली. या शेडमध्ये त्यांना डांबून ठेवले. या घटनेत दोघे अल्पवयीन मित्र जखमी झाले.

मध्यरात्री पोलिसांच्या गस्ती पथकास संशयास्पद हालचाली दिसल्याने त्यांनी धाव घेतली असता हा सर्व प्रकार उघड झाला. पथकाने शेडमध्ये डांबलेल्या चार मुलांची सुटका केली, या प्रकरणी संशयित सागर कुमावत, शेखर जगताप, ऋषी पगारे यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक रणदिवे करीत आहेत.