नाशिक : शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून परिमंडळ दोन अंतर्गत पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत टवाळखोरांना पिटाळून लावत तडीपार केलेल्यांचा शोध घेण्यात आला. त्यात तडीपार असूनही शहरात थांबलेल्या तलवारधारीस ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती शहर पोलिसांच्या वतीने देण्यात आली. शहरातील खून सत्र आणि सिडको, सातपूर, नाशिकरोड भागातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांकडून शक्य ते उपाय केले जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, अंबड विभागाचे सहायक आयुक्त शेखर देशमुख आणि नाशिकरोडचे सहायक निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आठवडाभर पोलीस ठाणेनिहाय विशेष शोध मोहीम राबवून गुन्हेगारांना पळता भूई थोडी केली. मध्यरात्री अचानक रस्त्यावर उतरत पोलिसांकडून झोपडपट्ट्यांसह गुन्हेगारांच्या घरांची झडती घेण्यात आली. या कारवाईत ४३ तडीपारांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत बुधवारी सिडकोतील सूरज शर्मा (२३, रा. महाकाली चौक, पवननगर) हा गुन्हेगार आढळून आला. शर्मा यास तडीपार करण्यात आले असतांनाही तो त्याच्या घरात मिळून आला. कुठलीही परवानगी न घेता तो शहरात वावरत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे शर्माकडे तलवारही सापडली.

हेही वाचा : तापी खोऱ्याचे पाणी गोदावरीत नेण्याचे कारण काय? संघर्ष समितीचा अजित पवार यांना प्रश्न

आठवडाभराच्या कारवाईत रात्रीच्या वेळी चौकाचौकात ठाण मांडणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी दणका दिला. ११२ जणांविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस नोंदीतील आणि तडीपार गुन्हेगारांची यापुढेही वेळोवेळी तपासणी केली जाणार असून टवाळखोरांना वठणीवर आणण्यासाठी कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik fugitive with sword detained by police in midnight action css