Godavari River Flood: तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले असून अनेक नद्या, नाल्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बागलाण, सुरगाणा तालुक्यात घरांची पडझड झाली. शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीची पातळी उंचावली असून काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसाने १२ धरणांतील विसर्गात वाढ करण्यात आली. सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी व इगतपुरी या तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुक्रवारपासून जिल्ह्यातील अनेक भागात सुरू असलेली संततधार रविवारीही कायम राहिली. उलट काही भागात त्याचा जोर वाढल्याने पूरस्थिती निर्माण झाली. घाटमाथ्यावरील भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मागील २४ तासात म्हणजे रविवारी सकाळी साडेआठपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या ३६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक १४१ मिलिमीटर पाऊस सुरगाणा तालुक्यात झाला. त्याखालोखाल पेठ (९८.५), त्र्यंबकेश्वर (८८.७), दिंडोरी (६८.५), इगतपुरी (६४), नाशिक (४२.४), कळवण (२७.८), बागलाण (२६.१), चांदवड (२३.३), सिन्नर (२२.७), निफाड (१८.५), मालेगाव (१७.९) मिलिमीटर पाऊस झाला. नांदगाव, येवला, देवळा भागात तुलनेत कमी पाऊस आहे.

हेही वाचा : नेपाळ बस अपघातातील २५ मृतदेह जळगावात नातेवाईकांकडे सुपूर्द

रविवारी दिवसभर पाऊस कायम राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील बहुतांश प्रमुख रस्ते खड्डेमय झाले असून वाहनांचे अपघात घडत आहेत. मध्यंतरी जे खड्डे बुजवले होते, तेही पूर्ववत झाल्यामुळे रस्त्यावर खड्डे, माती-दगडांचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. बागलाण तालुक्यात पावसात तीन घरांची पडझड होऊन पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. मुसळधार पावसाने मोसम, आरम, हत्ती, कान्हेरी या नद्यांना पूर आला आहे. पावसामुळे वडे खुर्द येथील विजय महाले, देवळाणे येथील जयराम नवरे, टिंगरी येथील गुलाब कुंवर यांच्या घरांच्या भिंती कोसळून नुकसान झाले. सुरगाणा तालुक्यात गोगुळ येथे अर्जुन घुले आणि बोरचोंड येथील अनिल कणसे यांच्या घराचे नुकसान झाले.

हेही वाचा : नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर; गोदावरी, दारणा, कादवा नद्या दुथडी भरून

नांदूरमध्यमेश्वरमधून ५२३०८ क्युसेकचा विसर्ग

जिल्ह्यातील अनेक धरणे तुडूंब भरली असल्याने अतिरिक्त पाणी सोडावे लागत आहे. मुसळधार पावसामुळे धरणांमधील वाढती आवक लक्षात घेऊन त्या अनुषंगाने पाण्याचा विसर्ग वाढविला जात आहे. गंगापूरमधून सोडलेले पाणी आणि शहर परिसरात सुरू असलेली संततधार यामुळे गोदावरी पूर येण्याच्या स्थितीत पोहोचली आहे. रविवारी सायंकाळी गंगापूरमधून ८४२८ क्युसेक, दारणा १४४१६, भावली ७०१, भाम २९९०, गौतमी गोदावरी २५६०, वालदेवी १०७, आळंदी २४३, नांदूरमध्यमेश्वर ५२२०८, भोजापूर २८००, पालखेड ४७७५, हरणबारी प्रकल्पातून सहा हजार आणि केळझर प्रकल्पातून ११०० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. गंगापूर, दारणा आणि पालखेड समुहातील पाणी नांदूरमध्यमेश्वरमार्गे पुढे मराठवाड्याकडे मार्गस्थ होते. या हंगामात बंधाऱ्यातून आतापर्यंतचा सर्वाधिक विसर्ग रविवारी सुरू होता.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik godavari river flooded due to heavy rainfall also houses damaged in baglan taluka css