नाशिक: शहर परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत आहे. पोलिसांकडून विविध प्रकारे गुन्हेगारांवर जरब बसविण्याचा दावा केला जात असतांना गुन्हेगार मात्र कोयते फिरवत, मागील भांडणाच्या कुरापती काढून पोलिसांना आव्हान देत दहशत माजवत असल्याचे पुन्हा आढळून आले. रविवारी रात्री जुन्या वादातून २६ वर्षाच्या गुन्हेगाराची हत्या करण्यात आली. शहराजवळील पाथर्डी गावात हा प्रकार घडला. इंदिरानगर पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या तासभरात सहा संशयितांना ताब्यात घेतले.

शनिवारी मध्यरात्री सातपूर परिसरात पाच ते सहा जणांनी रहिवासी परिसरात कोयते दाखवत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी मुख्य संशयितासह अन्य चार विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेत परिसरातून त्यांना फिरवले होते. रहिवाशांनी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले होते. या प्रकाराला काही तास उलटत नाही तोच रविवारी रात्री गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला नटेश साळवे (रा. विल्होळी) हा पाथर्डी गावातील काजी मंजिल इमारतीसमोरून जात असताना त्याला सहा जणांनी गाठले. जुन्या वादातून नटेशवर धारदार शस्त्रांनी वार करुन त्याची हत्या केली.

हेही वाचा: नाशिक : सातपूरमध्ये कोयत्यांसह धमकाविणारे ताब्यात, चार विधीसंघर्षित बालकांचा समावेश

घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शशिकांत गांगुर्डे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला. यश उर्फ आयुष दोंदे, प्रफुल दोंदे, दुर्गेश शार्दुल, रोहित वाघ, गौरव दोंदे आणि करण बावळ या सहा संशयितांना एका तासाच्या आत अटक केली. पुढील तपास निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोनार करत आहेत.

हेही वाचा: नाशिक : शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे प्रतिपादन

दरम्यान, नाशिक शहर परिसरात गुन्हेगारी कारवाया वाढत आहेत. शहरात सर्रासपणे हत्यारांचा वापर केला जात आहे. बंदूक, तलवार, कोयते यांसारखी शस्त्रे विधिसंघर्षित बालकेही वापरु लागली आहेत. असे असताना पोलीस यंत्रणा नेमकी काय करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एखादी घटना घडल्यावर संशयितांना पकडण्यात तत्परता दाखविण्यापेक्षा अशी घटना करण्याची गुन्हेगारांची हिंमतच होणार नाही, अशी जरब पोलिसांनी बसवायला हवी, अशी अपेक्षा नाशिककर करत आहेत.