नाशिक : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह वर्ग तीन आणि चारच्या नोकर भरतीसाठी गुरुवारपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या बेमुदत संपात आरोग्य विभागाचे कर्मचारीही सहभागी झाल्याने जिल्हा रुग्णालयासह अन्य शासकीय रुग्णालयांच्या कामकाजावर परिणाम झाला. आरोग्य विभागाने मात्र सर्वकाही व्यवस्थित असल्याचा दावा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांना संपात सहभागी होऊ नका, असे पत्राव्दारे बजावले होते. परंतु, गुरूवारी जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांसह अन्य कर्मचारी संपात सहभागी झाले. यामुळे बाह्यरुग्ण विभागातून दिली जाणारी सेवा काही काळ विस्कळीत झाली. परिचारिकांसह अन्य कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. नाशिक जिल्हा परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा कल्पना पवार यांनी जिल्ह्यातील सुमारे ५०० परिचारिका संपात सहभागी झाल्याचे सांगितले. संपामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होऊ शकतो, हे मान्य असून शासन मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने नाईलाजास्तव हे पाऊल उचलावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा : कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्यासाठी साकडे, भाजप आमदारांची उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

दरम्यान, संपाविषयी माहिती नसल्याने बाहेरगावांहून आलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. सफाई कर्मचारीही संपात सहभागी झाल्याने परिसरात काही ठिकाणी घाण साचली. रुग्णांना रुग्णवाहिकेतून ने-आण करण्याची जबाबदारी नातेवाईकांना पार पाडावी लागली.

हेही वाचा : धुळ्यात गुंगीकारक औषधांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

“संपाचा कुठलाही परिणाम कामकाजावर झालेला नाही. जिल्हा रुग्णालयातील परिचारिका प्रशिक्षण केंद्र तसेच मालेगाव येथील सामान्य रुग्णालयातील परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी परिचारिकांनी आरोग्य सेवेची सूत्रे हाती घेतली आहेत. याशिवाय गरज पडल्यास खासगी परिचारिका प्रशिक्षण केंद्रातूनही मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यात येईल. ज्या शस्त्रक्रिया रखडण्याची भीती होती, त्या नियोजनानुसार झाल्या. जिल्हा रुग्णालयात आपत्कालीन सेवा अखंडपणे सुरू राहिली. तसेच ३० शस्त्रक्रिया करण्यात आल्या. स्वच्छता कर्मचारी हे कंत्राटी असल्याने कुठलीही अडचण आली नाही.” – डॉ. चारूदत्त शिंदे (जिल्हा शल्य चिकित्सक)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik government hospital employees strike affected the operations in hospital css
Show comments