नाशिक : इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव आणि मोडाळे या गावात मंगळवारी राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा प्रस्तावित आहे. विकसित भारत संकल्प यात्रेचा एक भाग म्हणून मोडाळे गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, ग्रामपंचायतींची रंगरंगोटी, गावातील स्वच्छता, अखंडित विद्युत पुरवठा आदींची जय्यत तयारी शासकीय यंत्रणांकडून प्रगतीपथावर आहे.
या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी रविवारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. शासकीय यंत्रणांनी राजशिष्टाचाराचे पालन करून काटेकोर नियोजन करावे, दौऱ्याच्या अनुषंगाने आवश्यक बाबींची पूर्तता शीघ्रतेने करण्याची सूचना शर्मा यांनी केली. कुशेगाव येथील नियोजित हेलिपॅड, नाशिक आणि इगतपुरीतील शासकीय विश्रामगृह, व दौरा ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात यावी, असे त्यांनी सूचित केले. वाहतूक व्यवस्थेचेही सुयोग्य नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे. राज्यपालांच्या ताफ्यातील वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तपासणी करून ती सुस्थितीत असल्याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : जळगावात सकल मराठा समाजातर्फे छगन भुजबळ यांच्याविरोधात आंदोलन
कुशेगाव, मोडाळे या गावांचा चेहरामोहरा बदलण्याची धडपड केली जात आहे. ग्रामपंचायत कार्यालयांची रंगरंगोटी, गावातील स्वच्छता, अखंडित विद्युत पुरवठा, अनुषंगिक सुरक्षा व अन्य बाबींच्या व्यवस्थेबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे. सर्व विभागांनी आपली निश्चित केलेली जबाबदारी विलंब न करता त्वरेने पूर्ण करण्याची सूचनाही शर्मा यांनी केली.
हेही वाचा : बदनामीची धमकी देत २० कोटींच्या खंडणीची मागणी; १० लाख रुपये स्वीकारताना महिलेसह मुलास अटक
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी मोडाळे गावातील कार्यक्रमाची माहिती दिली. विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ काही दिवसांपूर्वीच झाला. याचाच एक भाग म्हणून मोडाळे गावात हा कार्यक्रम होत आहे. यासाठी आदिवासी विकास विभागच्या योजना, कृषी योजना, क्रिडा विषयक योजना, पी. एम. विश्वकर्मा, पी. एम. मुद्रा, आयुष्यमान भारत, पंतप्रधान आवास, उज्वला अशा विविध कल्याणकारी योजनांचे कक्ष आणि योजनांच्या माहितीचे फलक लावण्याची सूचना मित्तल यांनी केली.
हेही वाचा : नाशिक : विजेच्या धक्क्याने बालिकेचा मृत्यू
निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी प्रत्येक विभागाने करावयाच्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. यावेळी पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शहाजी उमाप, सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जितीन रहमान, उपवनसंरक्षक (पूर्व) उमेश वावरे, मनपा उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.