लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: आई -वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना कोणत्याही प्रकारचे दाखले अथवा योजनांचा लाभ न देण्याचा ठराव दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे. या ठरावाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
जानोरी ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच सुभाष नेहरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ग्रामविकास अधिकारी शैलेंद्र नरवाडे यांनी इतिवृत्त वाचून कायम केले. आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांचा विषय ग्रामसभेत निघाल्यावर अशा मुलांच्या वागणुकीविषयी सर्वांनीच संताप व्यक्त केला. अशा मुलांना ग्रामपंचायतीच्या वतीने कोणतेही शासकीय दाखले न देण्याचा तसेच शासकीय योजनांचा लाभ न देण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. ग्रामसभेचा हा ठराव परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
हेही वाचा… नाशिक : लाचखोर तहसीलदार बहिरमच्या पोलीस कोठडीत वाढ; दोन यंत्रणांकडून चौकशी
गावातील देशी दारु दुकान गावठाणाबाहेर स्थलांतर करण्यासाठी संबंधित विभागाशी पाठपुरावा सुरु असल्याचे सांगण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी गावातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. गावांतर्गत रस्ते, वाडीवस्तीवर पथदीप बसविणे, गावपाट दुरुस्ती करणे, गावाच्या वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरविणाऱ्या टाकीची साठवण क्षमता कमी पडत असल्याने विभागानुसार पाण्याच्या साठवणुकीसाठी टाक्यांमध्ये वाढ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आरोग्य उपकेंद्र (एक) जवळील बंधारा दुरुस्ती करण्याचा ठराव संमत करण्यात आला.
हेही वाचा… मणिपूर, मध्यप्रदेशातील आदिवासींवरील अत्याचाराविरोधात धुळ्यात मोर्चा
गावातील सर्व सरकारी गटांची मोजणी करुन त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत ठराव करण्यात आला. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर हर तिरंगा अभियान राबविण्याचे आवाहन ग्रामविकास अधिकारी नरवाडे यांनी केले. शासनाच्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेत स्पर्धा घेण्यात येणार असून त्याचे बक्षिस वितरण १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी तलाठी किरण भोये, उपसरपंच हर्षल काठे, सदस्य गणेश तिडके, विलास काठे, गणेश विधाते, संगीता सरनाईक, सारीका केंग, विश्वनाथ नेहरे तसेच सोपान काठे, योगेश तिडके, कैलास पगारे आदी उपस्थित होते.