नाशिक : शहर परिसरातील गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहता सुरक्षित नाशिकसाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत मंगळवारी शहर परिसरातील सार्वजनिक ठिकाणे, भाजीपाला विक्री, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी होणारे गुन्हे रोखण्यासाठी ग्राऊंड प्रेझेन्ट सिस्टीम-सुरक्षित नाशिक या प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत. याअंतर्गत सी.पी. व्हॉट्सअप क्रमांक, नाशिक पोलीस द्विटर, फेसबुक, नियंत्रण कक्ष येथे प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या समस्या समजावून घेतल्या जाऊन त्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी उपाय केले जातात. याशिवाय मॉर्निंग वॉक विथ पोलीस हा उपक्रम शहरातील वेगवेगळ्या जॉगींग ट्रॅकवर घेण्यात येत आहे. शहरातील गुन्हेगारांचा अभ्यास करत त्यांना सुधारण्याची संधी देत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता विधीसंघर्षित बालकांचे समुपदेशन व गुन्हेगार दत्तक योजना हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
नाशिककरांना अधिक तत्परतेने सेवा देता यावी यासाठी शहरातील गस्त व अन्य काही पोलिसी कौशल्याचा अभ्यास करत नवरेशम कौर ग्रेवाल आणि त्यांच्या पथकाच्या मदतीने ग्राऊंड प्रेझेन्ट सिस्टीम-सुरक्षित नाशिक ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. या प्रणालीच्या माध्यमातून पोलीस ठाणेनिहाय वेगवेगळी ठिकाणे, निवडणूकसंबंधी ठिकाणे, प्राधान्य क्रमावर असलेली ठिकाणे आदींचा समावेश आहे. या माध्यमातून अशा ठिकाणी नियोजित वेळेत पोलीस उपस्थित राहणार असून नागरिकांना सुरक्षितता मिळावी यासाठी संबंधित ठिकाणी गस्त घालतील.
हेही वाचा : जळगाव : उन्मेष पाटील यांच्या फलकातून कमळ गायब
सर्वसाधारण ठिकाणांमध्ये उद्याने, मोकळी मैदाने, जॉगिंग टॅक, बाजार, भाजीपाला विक्री, बस स्थानक, रेल्वे स्थानक, सराफाची दुकाने, बँका, महिलांचा वावर असलेली ठिकाणे अशा ३७ ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच शाळा, महाविद्यालय, धर्मस्थळे, महत्वाची शासकीय कार्यालये यांचाही समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून सुरक्षित नाशिकसाठी प्रयत्न होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुचनेनुसार या प्रणालीमध्ये वेळोवेळी बदल करण्यात येतील.
प्रणालीचे महत्व
प्रणालीमध्ये गटनिहाय सार्वजनिक ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. ठिकाणांनुसार सर्कल, स्टार, इमारतीचे चिन्हे व समुहाचे चिन्ह अशा विविध चिन्हांचा वापर करण्यात आला आहे. ही चिन्हे प्रणाली सुरू करतांना करड्या रंगाची असतील. या ठिकाणी गस्त घालणाऱ्या अंमलदारांनी भेट दिल्यानंतर हिरव्या रंगाची होतील. गुगलवर ही प्रणाली आधारीत असून या ठिकाणी अंमलदारांनी छायाचित्र काढून अपलोड केल्यानंतर आजूबाजूचा परिसर देखील दिसेल. यामुळे अंमलदारांना या ठिकाणी भेट देणे बंधनकारक राहील.