नाशिक : शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर या तस्करांशी राजकीय नेत्यांच्या असणाऱ्या संबंधांवरून आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. ठाकरे गटासह काँग्रेसने शहरातील अंमली पदार्थ तस्करीला सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरत या विरोधात २० ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर, सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. पाठोपाठ तरुणाई अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे उघड झाल्याने केवळ कारवाईवर न थांबता या संदर्भात व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. अंमली पदार्थ जनजागरण चळवळी संदर्भात मंगळवारी पालकमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे.
अंमली पदार्थ माफिया ललित पाटीलने पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर या तस्कराचे कुणाशी संबंध होते, यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून परस्परांना लक्ष्य केले जात आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी थेट भुसे यांच्यावर आरोप करीत त्यांच्याकडून पुरावे नष्ट केले जाण्याची भीती व्यक्त केली. शहरातील अंमली पदार्थ तस्करी, शहराची होणारी अधोगती याला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ हे जबाबदार असल्याचा आरोप करीत निषेधार्थ ठाकरे गटातर्फे २० ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेसने नाशिक बचाओ, ड्रग हटाओ मोहीम हाती घेतली आहे. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर, विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती चळवळीच्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. या संदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे.
हेही वाचा : अंमली पदार्थ कारखान्याला कोणाचे राजकीय आशीर्वाद ? पाळेमुळे खोदून काढण्यासाठी ठाकरे गट आग्रही
पालकमंत्री भुसे यांनी अवैध धंदेवाल्यांची गय करू नका, असे आधीच सूचित केले आहे. मंत्री भुसे यांनी काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थांबाबत माहिती मागवली होती. त्यानुसार शहरात पोलीस कारवाई करण्यात आली. पुढील काळात अवैध धंद्यांवर अधिक कठोर कारवाई होईल. अवैध धंदे चालकांना पाठीशी घातले जाणार नाही. असा इशारा भुसे यांनी दिला आहे. विशेष पथकांच्या माध्यमातून अन्य अवैध धंद्यांवरही टाच आणली जाईल. असे सांगितले जात आहे. बैठकीस जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त ,ग्रामीण पोलीस अधीक्षक, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक व प्रार्थमिक) , आरोग्य विभाग अधिकारी, अन्न व प्रशासन विभाग अधिकारी, प्रमुख शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, प्रमुख महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा : धुळे न्यायालयीन लिलावातून प्राप्त दागिने एकविरा देवीला अर्पण
“पोलीस प्रशासन कारवाई करेलच. मात्र त्याचवेळी समाजात विघातक परिणामांविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. जी तरुणाई व्यसनाच्या आहारी गेली आहे, त्यांचे मन परिवर्तन होणे गरजेचे आहे. त्यास अनुसरून काय उपाय योजना आखणे आवश्यक आहे. याचा बैठकीत उहापोह केला जाईल. नागरिकांनीही आपल्या काही सूचना असल्यास लेखी स्वरूपात पालकमंत्री कार्यालयात सादर कराव्यात.” – दादा भुसे (पालकमंत्री, नाशिक)