नाशिक : अमली पदार्थांविरूध्द ठाकरे गटाच्या वतीने शुक्रवारी काढण्यात आलेल्या मोर्चावेळी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देतांना पालकमंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणाची चौकशी करा, मागणी करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चीही चौकशी करण्यास सांगावे, असे आव्हान दिले. मंत्री छगन भुजबळ यांनी लोकशाहीत कोणाला काहीही बोलण्याचा अधिकार असल्याची प्रतिक्रिया दिली.
खासदार राऊत यांनी अमली पदार्थ माफिया ललित पाटील प्रकरणावरून शहरातील आमदारांवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर शहरातील भाजपच्या तीनही आमदारांनी पत्रकार परिषद घेत आम्ही चौकशीसाठी तयार आहोत, असे सांगितले होते. राऊत यांनी आरोपींची नावे जाहीर करत आरोप सिध्द करण्याचे आव्हान त्यांनी केले होते.
हेही वाचा : देवेंद्र फडणवीस खोटारडे, ललित पाटील शाखाप्रमुखही नव्हता, ठाकरे गटाचा दावा
शनिवारी पालकमंत्री दादा भुसे यांनीही ललित पाटीलचा तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला होता, असे सांगितले. त्या काळात राज्यमंत्री असल्याने आपण उपस्थित होतो. हा प्रवेश कोणाच्या माध्यमातून आणि कसा झाला याची सखोल चौकशी व्हावी, आम्ही चौकशीसाठी तयार आहोत पण चौकशीची मागणी करणाऱ्या व्यक्तीने आपलीही चौकशी करावी, असे सांगण्याचे आव्हान त्यांनी दिले.
हेही वाचा : गळतीमुळे विस्कळीत इंधन पुरवठा हळूहळू पूर्ववत, पर्यायी व्यवस्थेचा उपाय
मंत्री भुजबळ यांनी आपल्यावर काही आरोप झाले किंवा नाही, याविषयी माहिती नसल्याचे सांगितले. लोक काहीही बोलतील. भारत लोकशाहीप्रधान देश असून प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. लोकांना वाटते सहा हजार कोटींची संपत्ती भुजबळांकडे आहे. त्यातील ५०० कोटी माझ्याकडे राहु द्या, बाकी तुमच्याजवळ ठेवा, असा टोला त्यांनी हाणला.