मालेगाव : विशिष्ट कुटूंबाने कब्जा केलेल्या येथील महात्मा गांधी विद्यामंदीर आणि आदिवासी सेवा समिती या दोन शैक्षणिक संस्था सद्यस्थितीत तद्दन राजकीय अड्डा बनल्या आहेत, असा आरोप करीत या संस्थांचा कारभार लोकशाही पध्दतीने सुरु केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, अशी गर्जना पालकमंत्री दादा भुसे यांनी येथे केली. रविवारी येथे शिवसेना पक्षाचा मेळावा पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना भुसे यांनी ही ग्वाही दिली. यावेळी शिवसेनेचे पक्ष निरीक्षक हेमंत पवार, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, संपर्क प्रमुख सुनील पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यात महात्मा गांधी विद्यामंदीर व आदिवासी सेवा समिती या शिक्षण संस्थांच्या कारभारावर भुसे यांनी सडकून टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वेठबिगारासारखे राबविले जाते. तेथील शिक्षकांना ज्ञानदानाऐवजी राजकीय कामात जुंपले जात असल्याने शैक्षणिक दर्जा खालावला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असा सूर भुसे यांनी लावला. या दोन्ही शिक्षण संस्थांच्या उभारणीत मालेगाव तालुक्यातील अनेक कुटूंबाचे योगदान आहे. मात्र आता विशिष्ट कुटूंबाने या संस्थेवर कब्जा मिळविल्याचा आरोप करीत येत्या काळात या संस्थांवर तालुक्यातील प्रत्येक कुटूंबाचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार असल्याचे भुसे यांनी नमूद केले.

हेही वाचा : दुष्काळामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग ? मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची एकनाथ खडसे यांची तयारी

मेळाव्यात सध्याची दुष्काळसदृष्य स्थिती, विकास व लाभाच्या योजनांची अंमलबजावणी, शिवसेना पक्ष बांधणी आदी विषयांवर चर्चा झाली. जिल्हाप्रमुख संजय दुसाने, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, माजी उपमहापौर सखाराम घोडके, नीलेश आहेर, प्रमोद पाटील, सुनील देवरे, भरत देवरे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

राऊत यांना आव्हान

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी भुसे यांच्यावर दाभाडी येथील गिरणा सहकारी साखर कारखाना खरेदीच्या नावाने १७८ कोटीचा शेअर्स घोटाळा केल्याचा आरोप केला होता. याबद्दल राऊत यांचे नाव न घेता आरोप करणाऱ्यांनी ते सिध्द करुन दाखवावेच, असे आव्हान भुसे यांनी यावेळी दिले. विक्रीस निघालेला हा कारखाना मालेगाव आणि सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालकीचा व्हावा, या हेतूने तेव्हा शेअर्स गोळा करण्यात आले होते. त्यातून केवळ एक कोटी ६० लाख रुपये जमा झाले होते. ही सर्व रक्कम तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित कारखाना खरेदी करणाऱ्या कंपनीच्या खात्यात तेव्हाच जमा करण्यात आली, हे सर्वांना ज्ञात आहे. असे असताना चुकीच्या माहितीच्या आधारावर आपल्यावर खोटे आरोप केले जात आहेत, असे भुसे म्हणाले.

हेही वाचा : यंदाच्या वर्षात नाशिकच्या गुन्हेगारीत घट, गुन्हे उकल होण्याच्या प्रमाणात वाढ, १३ हजार टवाळखोरांवर कारवाई

हा कारखाना तेव्हा साडे सत्तावीस कोटींना विक्री झाला होता. जर १७८ कोटीचे शेअर्स जमा झाले असते तर हा कारखाना आम्हीच खरेदी नसता केला का, असा सवालही भुसे यांनी केला. तसेच येत्या १६ सप्टेंबर रोजी कारखाना खरेदी करण्यासाठी शेअर्स घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची मालेगावात बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीत जमा झालेल्या शेअर्स रकमेसंदर्भात आढावा घेण्यात येणार आहे. आरोप करणाऱ्यांनी या बैठकीत येऊन सभासदांसमोर घोटाळ्याचे आरोप सिध्द करुन दाखवावेत, असे आव्हान भुसे यांनी दिले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik guardian minister dada bhuse on mahatma gandhi vidyamandir and adivasi seva samiti malegaon css
Show comments