नाशिक : उत्पादन शुल्क विभागातील कर्मचारी असल्याचे भासवून भामट्याने ठाणे जिल्ह्यातील एका हॉटेल व्यावसायिकास लाखो रुपयांना फसविल्याचे उघड झाले आहे. मद्यपरवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवित १३ लाख रुपये घेण्यात आले. याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल बागूल असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी किरण शहा (रा. खारेगाव, कळवा, ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शहा यांचे भिवंडी येथे साई विहार नावाचे हॉटेल आहे. गेल्या वर्षी शहा मंत्रालयातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात गेले होते. या ठिकाणी त्यांची अनिल बागूलशी भेट झाली. याप्रसंगी संशयिताने नाशिकच्या उत्पादन शुल्क कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगून मद्य दुकान परवाना हस्तांतर विभागाची आपल्याकडे जबाबदारी असल्याचे सांगितले. हॉटेल व्यावसायिक शहा यांना बागूलने परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
ठाणे येथील कोर्टनाका विश्रामगृहात झालेल्या दुसऱ्या भेटीत संशयिताने सिंधुदुर्ग येथील स्वप्निल अग्रवाल यांच्या नावे असलेल्या बारचा परवाना मिळवून देतो, अशी बतावणी करुन त्यासाठी प्रथम चार आणि नंतर तीन लाख रुपये शहा यांच्याकडून स्वीकारले. काही दिवसांनी मंत्रालयात फाईल अडकल्याचा बहाणा करून पुन्हा पुणे येथील राजेंद्र पाटील यांचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवित पाच लाख रुपये घेतले. या परवान्यासाठी शहा आणि त्यांच्या मित्रांची पुण्यातील पाटील नामक व्यक्तीशी भेट घडवून आणण्यात आली होती.
या बैठकीत शहा यांच्याकडून एक लाख रुपये रोख आणि १० लाख रुपयांचा धनादेश स्वीकारण्यात आला. तरीही परवाना न मिळाल्याने शहा यांनी तगादा लावला असता संशयिताने नंदुरबार येथे आपल्या नावे असलेला परवाना हस्तांतरीत करून देतो, अशी थाप मारली. काही दिवसांनी पुन्हा शहा यांनी पाठपुरावा केला असता संशयिताने टाळाटाळ केली. त्यानंतर शहा यांनी नाशिक गाठून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात चौकशी केली असता, संबंधित नावाचा कर्मचारीच नसल्याचे उघड झाल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली.
अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून परवाना अथवा तत्सम कामाबाबत माहिती लागल्यास थेट कार्यालयाशी संपर्क साधावा, शासकीय अथवा खासगी व्यक्तीकडून आर्थिक मागणी झाल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.