लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: सागरमाला उपक्रमांतर्गत शुष्क बंदराचा विकास करण्यासाठी निफाड येथील नियोजित जागा हस्तांतरीत करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश केंद्रीय जहाज व बंदरेमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणला (जेएनपीटी) दिले आहेत.

देशात उत्तम दळणवळण व पुरवठा व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यात शुष्क बंदर विकसित करण्याच्या उद्देशाने नियोजित जमीन हस्तांतरणाची कार्यवाही करण्यासाठी जेएनपीए व्यवस्थापनाला निर्देश दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.

हेही वाचा… धुळे-मनमाड-दादर एक्सप्रेसला लवकरच नवे रुप

नाशिक विभागातून कृषी उत्पादने, द्राक्षे, कांदा, डाळिंब, निर्जलित कांदे, प्रक्रियायुक्त कृषीमाल, बांधकाम यंत्रणा, वाहनांचे सुटे भाग व औषधी उत्पादनांची निर्यात होते. ते लक्षात घेऊन नाशिकमध्ये शुष्क बंदर विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. या अनुषंगाने दिल्लीतील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी निफाड येथील साखर कारखान्याच्या जागेची पाहणी केली होती. जागेच्या सातबारा उताऱ्यावरील जीएसटी नोंद व इतर बोजा कमी करुन केंद्र सरकारला सातबारा सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

हेही वाचा… मालेगावात नव्या मालमत्तांवर वाढीव कराचा भार; राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्षेप

जेएनपीएने शुष्क बंदरासाठी निफाड साखर कारखान्याची जमीन योग्य असल्याचा निर्वाळा दिलेला आहे. ती खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी भारमुक्त जमिनीच्या हस्तांतरणाची रक्कम कळवली होती. जेएनपीटीला कारखाना क्षेत्रालगत असणारी अतिरिक्त खासगी जागा लागणार आहे. त्या जमिनीच्या संपादनाची किंमत कळविण्याचे सूचित करण्यात आल्याकडे डॉ. पवार यांनी लक्ष वेधले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik instructions for transfer of nifad site for dry port dvr
Show comments