नाशिक : शहरातील रस्त्यांना अतिक्रमणांचा पडलेला विळखा आता नाशिककरांच्या जीवावर बेतत आहे. महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जात असली तरी सातत्याअभावी पुन्हा त्याच ठिकाणी किरकोळ विक्रेते, खाद्यपदार्थ, फळविक्रेते जम बसवतात. इंदिरानगर बोगद्याजवळून सिटी सेंटर मॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी झालेल्या अपघातात मोटारीची धडक बसून शिक्षिकेचा मृत्यू झाल्यानंतर तरी महापालिकेला जाग येणार आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका गायत्री ठाकूर या रविवारी दुपारी लग्न समारंभ आटोपून मैत्रिणींसह घरी येत होत्या. सिटी सेंटर माॅलपुढे गोविंद नगरकडे जाणाऱ्या जोडरस्त्यावर त्या दुचाकीने आल्या. मैत्रिणीबरोबर मनोहर गार्डनसमोर रस्त्याच्या कडेला असलेल्या रसवंतीजवळ रस घेण्यासाठी थांबल्या. त्यावेळी भरधाव मोटारीने त्यांना, तसेच पुढील दोन वाहनांना धडक दिली. या अपघातात गायत्री ठाकूर (३८) यांचा मृत्यू झाला.त्यांची मैत्रीण आणि अजून एक जण जखमी असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातास कारणीभूत वाहनचालक सौरभ भोपे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
गोविंद नगर परिसरातील जॉगिंग उद्यानालगत व्यावसायिकांनी बस्तान बसवले आहे. याठिकाणी असलेल्या पदपथावर अल्पोहार, रस, भ्रमणध्वनी, पर्स अशी लहान मोठी दुकाने आहेत. याठिकाणी लोक थांबतात. आपली वाहने मिळेल त्या जागी उभी करतात. यामुळे वाहनचालकांना या परिसरातून मार्ग काढणे कठीण होते. याशिवाय पदपथ व्यावसायिकांनी व्यापल्यामुळे रस्त्याने पायी चालणारेही या कोंडीत भर घालतात. रविवारी झालेल्या अपघातानंतरही प्रशासन उदासिन असले तरी परिसरातील गर्जना सामाजिक संस्थेच्या वतीने या रस्त्यावर फलक लावण्यात आला असून संबंधित ठिकाणी व्यावसायिकांना दुकाने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. दुकाने लावल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
क्षणात सारे उदध्वस्त
रविवारी गायत्री ठाकूर या शाळेतील ओळखीच्या व्यक्तीकडे लग्नासाठी गेल्या होत्या. त्यानंतर घरी परतत असतांना अपघात झाला. गायत्री आणि त्यांच्या चारही बहिणी रविवारी सायंकाळी त्यांच्या घरी एकत्र येणार होत्या. त्यांचा छोटासा स्नेहमेळावा होता. मात्र त्यांच्या मृत्युची माहिती समजताच त्यांच्या दोन्ही मुलींसह घरातील सर्व सदस्य सैरभैर झाले. एका क्षणात सारे उदध्वस्त झाल्याने मुलींना सांभाळायचे की घरातील ज्येष्ठांना आधार द्यायचा, असा प्रश्न गायत्री यांच्या पतीला पडला.