लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: नांदगाव तालुक्यातील साकोरे (पुनर्वसाहत पांझण) येथील वन व महसूल जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम कायमस्वरुपी बंद करावे आणि जमीन कसणाऱ्या कब्जेदारांच्या नावे करावी, या मागणीसाठी १५ मेपासून किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकरोड येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या बाबतचे निवेदन भाकपचे राज्य सहसचिव राजू देसले, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष देविदास भोपळे, उपाध्यक्ष प्रकाश भावसार आणि कसणाऱ्या जमिनधारकांनी जिल्हा प्रशासनाला दिले. ही जागा कसण्यासाठी शासनाने फार्मिंग सोसायटीमार्फत भूमिहीनांना दिली असतांना ती जमीन सौर ऊर्जा उद्योग कशी खरेदी करू शकते, असा प्रश्न करत या सर्व प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.
हेही वाचा… नाशिक : चाळीतील उन्हाळ कांदा फेकण्याची वेळ; पाऊस, वाईट हवामानाने प्रतवारीवर परिणाम
फार्मिंग सोसायट्या अवसायनात निघाल्यानंतर नांदगाव तहसीलदारांनी १९७९ रोजी संस्थेला दिलेली जमीन ताब्यात घेऊन सदरी सरकार नाव दाखल केले, असे पत्र काढले आहे. ही जमीन ३५ वर्षाहून अधिक काळापासून भूमीहीनधारक कसून उदरनिर्वाह करत आहे. या काळात वन विभागाने अतिक्रमण केले म्हणून दंड केलेला आहे. त्याच्या पावत्या जमीनधारकांनी सादर केल्या.
हेही वाचा… धुळे तालुक्यात बनावट दारु अड्डा उदध्वस्त
भूमीहीन असल्याने ही जमीन कसण्यासाठी कायमस्वरूपी आमच्या नावावर व्हावी, यासाठी शासनाशी वारंवार पत्र व्यवहार केलेला आहे. मात्र अद्याप त्याची दखल घेतली गेली नाही. आता ही शेतजमीन हिसकावण्याचा प्रयत्न संबंधित कंपनी करीत असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला. शासनाने कसत असलेली जमीन कसणाऱ्यांच्या नावावर करावी या मागणीसाठी १५ मेपासून विभागी महसूल आयुक्त कार्यालयासमोर किसान सभेच्या नेतत्वाखाली उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा… कनिष्ठ सहायकाची हिंमत बघा, शाखा अभियंत्याकडून लाच घेतली
शासनाने याची दखल घेऊन साकोरे, न्यू पांझण शिवारातील भूमीहिन शेतकऱ्यांना न्याय द्यावा व जमीन कसणाऱ्यांच्या नावावर करावी अशी मागणी संबंधितांनी केली. साकोरे (पुनर्वसाहत पांझण) गट क्रमांक एकमधील जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्पाने अतिक्रमण केले आहे. ते महसूलच्या हद्दीत आहे की नाही याची स्पष्टता केली जात नाही, ही बाब मांडण्यात आली.