नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवीन अतिदक्षता कक्षात आवश्यक ती उपकरणे बसविली गेली. प्राणवायू, व्हेंटिलेटर व तत्सम व्यवस्थाही करण्यात आली. परंतु, या इमारतीत रुग्णांची ने-आण करण्यासाठी जे उद्वाहन लागते, ते नसल्याने हा अतिदक्षता कक्ष बंद ठेवावा लागल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. जिल्हा शासकीय रुग्णालयांप्रमाणे संदर्भ सेवा रुग्णालयाची स्थिती आहे. सहा महिन्यांपासून या ठिकाणी पूर्णवेळ अधिष्ठाता नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दानवे यांनी जिल्हा व संदर्भ सेवा रुग्णालयाची पाहणी केली. नंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नाशिकसह राज्यातील शासकीय रुग्णालयांतील स्थिती कथन केली. नांदेड, नागपूर, संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयांत वेगवेगळ्या पध्दतीने अनेक रुग्णांचे मृत्यू झाले. त्यास सरकारची बेपर्वाई कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक रुग्णालयात पुरेसे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी नाहीत. रुग्णालयांना औषधांचा पुरवठा होत नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. सरकारने मध्यवर्ती औषध खरेदीसाठी जे प्राधिकरण स्थापन केले, त्यांच्याकडून एक रुपयाचीही औषध खरेदी झाली नाही. खरेदी दूर त्यांनी निविदाही काढली नसल्याचा आक्षेप त्यांनी नोंदविला.
हेही वाचा : अमली पदार्थ विरोधी जनजागृतीतून विरोधकांना प्रत्युत्तर, दादा भुसे यांच्या उपस्थितीत आज बैठक
हाफकिनदेखील औषध खरेदीचे काम करत होती. तिला नाहक बदनाम केले जात आहे. या संस्थेने २०२२-२३ वर्षात १०६ कोटींची मागणी केली होती. परंतु, तिला त्या वर्षात सरकारने निधी दिला नाही. गेल्यावर्षीच्या मागणीतील ५० कोटी अलीकडेच टप्याटप्प्याने देण्यात आले. उपरोक्त जिल्ह्यात रुग्णांच्या मृत्युच्या भयावह घटना समोर आल्यानंतर जिल्हा नियोजन समितीचा निधी स्थानिक पातळीवर औषध खरेदीसाठी वापरला जातो. वैद्यकीय शिक्षण अधिष्ठातांना औषध खरेदीचे काही प्रमाणात अधिकार आहेत. सरकारने औषध खरेदीसाठी निधी दिला नाही वा खरेदी केली नसल्याचा आरोप दानवे यांनी केला.
हेही वाचा : धुळे न्यायालयीन लिलावातून प्राप्त दागिने एकविरा देवीला अर्पण
नाशिक जिल्हा रुग्णालयातही वेगळी स्थिती नाही. रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितले जाते. या रुग्णालयातील एका इमारतीतील (सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी बांधलेली इमारत) दुसऱ्या मजल्यावर नवीन ३५ ते ४० खाटांचा अतिदक्षता कक्ष तयार करण्यात आला आहे. उद्वाहनाअभावी तो कार्यान्वित होऊ शकला नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात पूर्णवेळ अधिष्ठाता नाही. सरकारला नागरिकांच्या आरोग्याची काळजी आहे काय, असा प्रश्न निर्माण होतो. सरकार शासन आपल्या दारी घोषणा करते, पण मृत्यू घरोघरी पाठवते का, अशी शंका असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा : अंमली पदार्थ कारखान्याला कोणाचे राजकीय आशीर्वाद ? पाळेमुळे खोदून काढण्यासाठी ठाकरे गट आग्रही
रुग्णालयाने आक्षेप फेटाळले
मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात बांधलेल्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर नव्या अतिदक्षता कक्षाचे काम सुरू आहे. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता कक्ष सध्या जुन्या इमारतीत आधीच्या जागी कार्यान्वित आहे. त्यामुळे हा कक्ष बंद आहे, असे म्हणणे अयोग्य आहे. नव्या अतिदक्षता कक्षासाठी दोन वेगवेगळ्या उद्वाहनाची आवश्यकता आहे. त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. ते पूर्णत्वास गेल्यानंतर हा कक्ष कार्यान्वित होईल. करोना केंद्र म्हणून या इमारतीचा वापर झाला. या इमारतीत पहिल्या मजल्यावर आपत्कालीन तर दुसऱ्या मजल्यावर अतिदक्षता विभाग करण्यात येणार असल्याचे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.