नाशिक: अंबड येथील फडोळ मळा भागात बुधवारी भुयारी गटार विभागाच्या ठेकेदाराकडून सुरु असलेल्या खोदकामावेळी एलपीजी गॅसच्या वाहिनीला गळती लागल्याने स्थानिकांची एकच धावपळ उडाली. वाहिनी फुटल्यानंतर गॅसच्या दाबाने आवाज येऊ लागला. व्हॉल्व्ह बंद केल्यानंतर २० मिनिटांनी ही गळती थांबली. मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमएनजीएल कंपनीकडून थेट घरात एलपीजी गॅसचा पुरवठा करण्यासाठी संपूर्ण शहरात वाहिन्यांचे जाळे टाकण्यात आले आहे. महापालिकेकडून रस्ते, गटार व तत्सम कामांसाठी खोदकाम होत असते. यावेळी गॅस वाहिनीची माहिती न घेता खोदकाम करणे नागरिकांचा जीव धोक्यात टाकणारे ठरू शकते. बुधवारच्या घटनेने तेच अधोरेखीत केले. फडोळ मळा भागात भुयारी गटार विभागाच्या ठेकेदाराकडून हे खोदकाम सुरू असल्याचे स्थानिकांकडून सांगितले गेले. त्यावेळी गॅस कंपनीची वाहिनी फुटली. खोदकामासाठी संबंधिताने परवानगी घेतली होती की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : नाशिक: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघांना २० वर्ष कारावास

जेसीबी यंत्राच्या सहाय्याने खोदकाम केले जात असताना गॅस वाहिनी फुटली. त्यातून आवाज होऊन गॅस बाहेर पडू लागला. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडू लागले. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलीस आणि गॅस वाहिनीचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. वाहिनीतील गळती बंद करण्यासाठी या भागातील व्हॉल्व्ह बंद करण्यात आला. जवळपास २० मिनिटांनी ही गळती थांबली. तेव्हा स्थानिकांचा जीव भांड्यात पडला. पावसाळ्याच्या तोंडावर खोदकामाला परवानगी दिली जात नाही. असे असताना या ठिकाणी खोदकाम कसे केले गेले, खोदकामाआधी गॅस वाहिनीची माहिती घेतली जाते की नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या संदर्भात विभागीय अधिकारी सुनिता कुमावत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पावसाळ्यात खोदकामाला प्रतिबंध असल्याचे नमूद केले. खासगी ठेकेदाराकडून खोदकाम सुरू असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik leakage of gas pipeline in ambad due to excavation css
Show comments