नाशिक : येथील देवळाली कॅम्प परिसरात शुक्रवारी सकाळी ११६ पॅराइन्फ्रंर्टी बटालियन भागात नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. या बिबट्याचे वय सात ते आठ महिने असल्याचा अंदाज आहे.
वनविभागाला याविषयी स्थानिकांकडून माहिती देण्यात आली. वनविभागाने जागेवर जाऊन पंचनामा केला. दोन बिबट्यांच्या झुंजीत जखमी होऊन सदर बिबट्या मृत झाला असावा आणि त्यानंतर इतर प्राण्यांनी त्याची पाठ आणि मानेकडील भाग खाल्ल्याचे पशुधन विकास अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनानंतर सांगितले. बिबट्याचे इतर अवयव (नखे, दात, मिशा इ.) सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले.
म्हसरूळ येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात नाशिक पश्चिमचे सहायक वनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकारी नाशिक यांचे समक्ष बिबट्याचे दहन करण्यात आले.