नाशिक : अलिकडेच गंगापूर रोडवरील रामेश्वर नगर परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला असताना शनिवारी शहरातील बेंडकुळे मळा परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. गंगापूर रोड जवळील रामेश्वर नगर परिसरात सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या लोकांना चार दिवसापूर्वी बिबट्या दिसला होता. त्या भागात एका कुत्र्याची बिबट्याने शिकार केली होती. वन विभागाने दोन तासांहून अधिक काळ बिबट्याचा शोध घेऊनही बिबट्या न सापडल्याने ही शोध मोहीम थांबविण्यात आली होती.
हेही वाचा : “मुलगा देशाशी गद्दारी करणे अशक्य”, गौरव पाटीलच्या वडिलांचा दावा
खबरदारीचा उपाय म्हणून वन अधिकाऱ्यांनी बेंडकुळे मळा परिसरात पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात शनिवारी बिबट्या जेरबंद झाला. पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी वन विभागाला या विषयी माहिती दिली. वन अधिकारी अनिल अहिरराव आणि अन्य सहकाऱ्यांनी बिबट्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. बिबट्या नर असून सहा वर्षाचा आहे. त्याला गंगापूर रोड येथील वन वाटिकेत हलविण्यात आले आहे.