नाशिक : महायुतीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मैदानात उतरविण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी करावी की नाही, यावरुन सकल मराठा समाजात मतभेद निर्माण झाले आहेत. काहींना भुजबळ यांच्या विरोधात उमेदवार उभा करणे आवश्यक वाटत असताना एका जागेवर वेगळी भूमिका घेणे अयोग्य असल्याने स्थानिक पातळीवरील प्रभावी उमेदवाराच्या पाठिशी राहण्याचा विचार होत आहे. मराठा मतांचे विभाजन टाळण्यासाठी समाजधुरिणांकडून दक्षता घेतली जात आहे.
महायुतीत तीनही पक्षांच्या दावेदारीमुळे वादात सापडलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात कुरघोडीचे राजकारण सुरु झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलून थेट दिल्लीहून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भुजबळ यांना उमेदवारीसाठी सूचना केली आहे. खुद्द भुजबळ यांनी ही माहिती दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटातील अस्वस्थता वाढली आहे. आंतरवली सराटी येथील बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी प्रत्येक मतदारसंघात सकल मराठा समाजातर्फे अपक्ष उमेदवार उभे करण्यास नकार दिला. ‘सगेसोयरे’ शब्दासह ओबीसीतून आरक्षण देण्यास जे उमेदवार अनुकूल असतील त्यांना निवडून द्या आणि जे प्रतिकूल असतील त्यांना पाडा, असे आवाहन जरांगे यांनी केल्याने याआधी अपक्ष उमेदवार देण्यासाठी तयारी करणाऱ्या जिल्ह्यातील सकल मराठा समाजातही संभ्रम निर्माण झाला आहे.
हेही वाचा : नाशिक-सप्तश्रृंग गड ई बससेवा
अलीकडेच मराठा समाजाच्या झालेल्या बैठकीत नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात उमेदवारीविषयी चर्चा करण्यात आली होती. नाशिक लोकसभेसाठी काही जण इच्छुक होते. निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचेही ठरले. परंतु, जरांगे यांच्या नव्या सूचनेनंतर ही प्रक्रिया स्थगित करावी लागणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनावेळी जरांगे आणि भुजबळ यांच्यात चांगलीच जुंपली होती. त्यामुळे किमान नाशिकच्या जागेवर भुजबळ यांच्या विरोधात उमेदवार उभे करण्यास परवानगी मागितली जाईल, असे आंदोलक तथा इच्छुक नाना बच्छाव यांनी म्हटले आहे. परंतु, अशा पध्दतीने एखादी जागा लढण्यास समाजातून अनेकांचा विरोध असल्याकडे सकल मराठा समाजाचे नेते चंद्रकांत बनकर यांनी लक्ष वेधले आहे.
हेही वाचा : नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू
स्थानिक पातळीवर ज्याचा प्रभाव जास्त असेल, जो मराठा समाजाच्या मागण्यांचे समर्थन करेल, त्याला पाठिंबा देण्याचे धोरण स्वीकारले जाईल. या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. सर्वांची मते जाणून निवडणुकीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
चंद्रकांत बनकर ( नेते, सकल मराठा समाज,नाशिक)
मत विभाजन टाळण्यासाठी सावधगिरी
एकाच जागेवर मराठा समाजाचे अधिक उमेदवार उभे राहिल्यास त्याचा फायदा तिसऱ्या उमेदवारास मिळेल. त्यामुळे मत विभाजन टाळण्यासाठी प्रत्यक्ष निवडणुकीपासून दूर राहण्याचा विचार मराठा समाजातील ज्येष्ठ मंडळींचा आहे. राजकीय पक्षही मराठा समाजाचे उमेदवार देत आहेत. नाशिकसह कोणत्याही मतदारसंघात मतांचे विभाजन झाल्यास त्याचा अन्य उमेदवारांना लाभ होऊ शकतो, याचा विचार सकल मराठा समाजाकडून केला जात आहे.