नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शहरातील अनावरण झालेले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्धाकृती कांस्य पुतळे असलेले स्मारक वादात सापडले आहे. स्मारकातील एका शिलालेखात महात्मा फुले यांच्या पुस्तकातील ओळी उदधृत केल्या असून मूळ ओळींमधील ‘शुद्र’ उल्लेख असलेली ओळ वगळण्यासह अन्य काही चुका घडल्याचे उघड झाले आहे. यावरून नव्या वादाला तोंड फुटताच महापालिकेने युद्धपातळीवर शिलालेखात दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

अन्न, नागरी पुरवठामंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून मुंबईनाका येथील सावित्रीबाई फुले चौकात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. स्मारकातील पुतळ्यांचे अनावरण शनिवारी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भुजबळ यांच्या उपस्थितीत झाले. फुले दाम्पत्याचे देशातील सर्वात मोठे पुतळे या स्मारकात असल्याचे भुजबळ यांच्याकडून सांगण्यात आले होते. महात्मा फुले यांचा पुतळा १८ फूट तर सावित्रीबाई फुले यांचा पुतळा १६.५० फूट आहे. सुमारे पावणेपाच कोटी रुपये खर्चून उभारलेल्या स्मारकात महात्मा फुले यांच्या ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या पुस्तकातील ओळींचा उल्लेख असलेला शिलालेख आहे.

हेही वाचा : विधानसभेत दादा भुसे यांच्या प्रश्नांची पाटी कोरीच, नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक प्रश्न मांडणाऱ्यांत हिरामण खोसकर प्रथम

फुले यांनी ‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले” असे म्हटले होते. परंतु, शिलालेखात ‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले,’ असा उल्लेख आहे. शिलालेखात ‘वित्ताविना शुद्र खचले’ ही ओळ गायब आहे. तर ‘गतीविना वित्त गेले’ या मूळ ओळीत बदल करुन ती ‘गतीविना वित्त खचले’ अशी करण्यात आली. या चुका समोर येताच राजकीय पातळीवर वातावरण तापले.

फुले यांनी ‘वित्ताविना शुद्र खचले’ या ओळीतून समाजातील जातीय विषमतेमुळे शूद्र वर्गाचे शिक्षण, संपत्ती व सामाजिक प्रगती कशी रोखली गेली हे ठळकपणे मांडले होते. या ओळीतून शूद्र म्हणजे बहुजन समाज अपेक्षित आहे. जातीमुळे नाकारलेल्या शिक्षणामुळे आणि संपत्तीच्या कमतरतेमुळे सामाजिकदृष्ट्या शूद्र कसे मागे पडले, हे त्यातून अधोरेखीत होते. फुले यांची ओळ वगळण्यामागे महायुती सरकारची जातीयवादी प्रवृ्ती स्पष्टपणे दिसून येते. शुद्र आणि बहुजनांच्या ऐतिहासिक दुखण्यांवर उपचार करण्याऐवजी त्यांच्या वेदना व संघर्ष इतिहासातून पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव तल्हा शेख यांनी केला. सरकारने आठवडाभराच्या आत तातडीने योग्य ती दुरुस्ती करावी, अशी मागणी शेख यांच्यासह अनेकांकडून होत आहे. महापालिकेने मंगळवारी सकाळी शिलालेखावरील धातूचे शब्द तातडीने काढण्याचे काम हाती घेतले.

हेही वाचा : Niphad : निफाडला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघर्षाची पार्श्वभूमी, वाचा काय आहे खासियत?

शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या स्मारकाच्या कामात सर्वतोपरी गुणवत्ता पाळण्याचा आम्ही प्रयत्न केला. भर पावसात घाईघाईत काम करताना कारागिरांकडून ही चूक झाली. लोकार्पणावेळी यासह अन्य काही बाबी आमच्या लक्षात आल्या. यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याची सूचना महानगरपालिकेला करण्यात आली आहे. – समीर भुजबळ (अध्यक्ष, मुंबई, राष्ट्रवादी अजित पवार गट)