नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात ग्रामीण आणि शहरी असे दोन भाग असून दोन्ही विभागांचे नागरी प्रश्न वेगवेगळे असल्याने त्यांचा समावेश असलेला जाहीरनामा महाविकास आघाडीतर्फे तयार करण्याचा निर्णय येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला. महायुतीच्या उमेदवारीचा तिढा नाशिक मतदारसंघात कायम असतांना महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडीच्या वतीने नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी गुरूवारी येथे सर्व घटकपक्षांची बैठक घेण्यात आली. नागरिकांच्या समस्यांचा समावेश जाहीरनाम्यात करण्याचे आश्वासन बैठकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी दिले. उमेदवारी न मिळाल्याने नाराज विजय करंजकर हे बैठकीस अनुपस्थित होते. वाजे यांनी, बैठकीसाठी करंजकर यांना निमंत्रण दिले होते, असे सांगितले. माजी आमदार योगेश घोलप आपल्याबरोबर असल्याचा दावा केला. सर्वांनी आपली स्वत:ची निवडणूक समजून काम करावे, असे आवाहन वाजे यांनी केले. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी, महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार विजयी करण्याचा निश्चय केला.
हेही वाचा : “भाजप जळगावमध्ये उमेदवार बदलणार”, संजय सावंत यांचा दावा
बैठकीत प्रचार कसा केला पाहिजे, मतदारांपर्यंत कसे जावे, याविषयी चर्चा करण्यात आली. निवडणूक प्रचारासाठी घरोघरी पत्रक वाटण्यास सुरूवात झाली असून विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. अन्य मित्रपक्षांबरोबर विभागनिहाय, वॉर्डनिहाय प्रचार करण्याचे नियोजन कसे असेल, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी विधानसभानिहाय सभा होणार असून १५ मे रोजी नाशिक येथील अनंत कान्हेरे मैदानात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होईल. २६ एप्रिल ते तीन मे या कालावधीत नाशिक आणि दिंडोरीचे उमेदवार अर्ज भरतील. जाहीरनामा तयार करण्यासाठी सर्व पक्षांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर जाहीरनामा तयार केला जाईल, असे बडगुजर यांनी सांगितले. मित्रपक्षांमध्ये कुठलीही नाराजी नसून सर्व एकत्रित काम करतील, असा विश्वास व्यक्त केला. बैठकीस ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गजानन शेलार, माजी आमदार नितिन भोसले, काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील, माकप, आम आदमी पक्ष आदी मित्र पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.