मालेगाव : मालेगाव-मनमाड रोडवरील घोडेगाव शिवारात सुरू असलेल्या बनावट देशी-विदेशी मद्य निर्मिती कारखान्याचा छडा लावण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे. या कारखान्यावर टाकलेल्या छाप्यात चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे ७० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयितांमध्ये तीन परप्रांतीयांचा समावेश आहे.
नाताळ व नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मद्य खरेदीसाठी मद्यप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहत असतो. ही संधी साधून नामवंत कंपन्यांच्या नावाखाली बनावट देशी-विदेशी मद्याची निर्मिती करून त्याची बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न असल्याची गोपनीय माहिती मालेगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक लीलाधर पाटील यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक शशिकांत गर्जे, उपअधीक्षक अमृत तांबारे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली आहे. एका शेतातील हिरवी नेट व त्यावर काळ्या ताडपत्रीने बंदिस्त असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बनावट मद्यनिर्मिती होत असल्याचे या पथकाला आढळून आले आहे.
हेही वाचा : उत्पादन घटल्याने अर्ली द्राक्षांना अधिक दर, निर्यातीतील अडथळे कायम
हे मद्य रॉयल स्टॅग व रॉकेट संत्रा या कंपनींची निर्मिती आहे, हे भासविण्यासाठी संबंधित नावाच्या बाटल्यांमध्ये हे बनावट मद्य भरुन त्या बाटल्या खोक्यांमध्ये ठेवण्यात आल्याचेही पथकाला आढळले. हा सर्व मुद्देमाल तसेच या ठिकाणी असलेला कच्चा माल, बॉटलिंग यंत्र, पाणी गाळप यंत्र, देशी-विदेशी मद्याच्या बाटल्यांची जिवंत बुचे, देशी-विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या, देशी-विदेशी मद्याच्या नावांचे कागदी लेबल, पिकअप वाहन आदी ऐवज पथकाने जप्त केला. या प्रकरणी भंगी पवार (३०, रोहिणी, शिरपूर,धुळे),किरण चव्हाण (२३), प्रकाश बारेला (३५) व रांतीलाल बारेला(४२, तिन्ही बडवाणी, मध्यप्रदेश या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा : शाळांना शिक्षण मंत्री, सचिवांच्या लवकरच अचानक भेटी दादा भुसे यांचे प्रतिपादन
बनावट मद्यनिर्मितीसाठी लागणाऱ्या साहित्याचे पुरवठादार, कारखान्यासाठी जागा व अन्य सुविधा उपलब्ध करून देणारे मालक, वाहन मालक, मद्य खरेदीदार अशा घटकांचा आता उत्पादन शुल्क विभागातर्फे शोध घेण्यात येत आहे. पथकात निरीक्षक लीलाधर पाटील, दुय्यम निरीक्षक हर्षराज इंगळे, सागर नलवडे, रियाज शेख, अमोल भडांगे, दिलीप महाले आदींचा समावेश होता.