नाशिक : महायुतीचे सरकार विचारधारेवर नव्हे, तर खोक्यावर बनले आहे. यामुळे हे सरकार गरीबांसाठी काहीच करणार नाही. केवळ आश्वासनांवर भर देत राहील. या सरकारने शेतमालासाठी काय केले, बेराेजगारांसाठी काय केले, असे प्रश्न काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केले. इगतपुरी मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार लकी जाधव यांच्या प्रचारासाठी त्र्यंबकेश्वर येथे गुरुवारी खरगे यांची जाहीर सभा झाली. खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महायुती सरकारवर ताशेरे ओढले. काँग्रेसने कर्नाटक, तेलंगणात दिलेली आश्वासने पूर्ण केली. जो बोलतो, जसा वागतो, त्याला नमस्कार करायला हवा. पंतप्रधान मोदी काय करतात ? पंतप्रधान झाल्यास परदेशात गेलेले काळे धन भारतात आणून तुमच्या खात्यात जमा करेल, असे त्यांनी सांगितले होते. पण केले का ? रोजगार देणार, असे आश्वासन दिले होते. पण दिले का ? कोण खोटे बोलत आहेत, असा प्रश्न खरगे यांनी केला.

हेही वाचा : नाशिक: एकाच दिवसात ३४९ गुन्हेगार हद्दपार

मोदी, शहा हे प्रत्येक वेळी कलम ३७० किंवा वेगळ्याच मुद्यांवर बोलत राहतात. स्थानिक प्रश्नांशी याचा काय संबंध, असा प्रश्न करुन त्यांनी शेतीमालाला हमी भाव, सोयाबीन, कांद्याला भाव याविषयी बोलायला हवे, असे खरगे यांनी सांगितले. पंतप्रधान हे केंद्र सरकार चालविण्यापेक्षा राज्यात प्रचारासाठी फिरत आहेत. काँग्रेसमुक्त भारतची घोषणा करत आहेत. उलट, काँग्रेसचे लोकप्रतिनिधी वाढत आहेत. तुम्ही ४०० पारचा नारा दिला होता. प्रत्यक्षात तुमची संख्या कमी झाली. काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापेक्षा मोदी यांनी आपल्या लोकांना कसे वागायला हवे, भ्रष्टाचारमुक्त कसे होता येईल, याचे धडे द्यायला हवेत. महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी याठिकाणी भाजपसह महायुतीचे अनेक जण आले. आपण सर्वांनी एक होत देशातील गरीबी हटविण्यासाठी काम करायला हवे. देशात झालेला विकास हा मोदींच्या काळातील नाही. मोठी कामे ही काँग्रेसच्या काळातील आहेत. भाजप राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना मारणाऱ्या नथुराम गोडसे यांचे गोडवे गात आहे. तुम्ही ठरवा, तुम्हाला कोणाला मत द्यायचे, असे आवाहन खरगे यांनी केले. यावेळी खासदार डाॅ. शोभा बच्छाव, उमेदवार लकी जाधव, काँग्रेस पदाधिकारी आकाश छाजेड तसेच इतर उपस्थित होते.