नाशिक : गोदावरी नदीपात्रात गंगापूर धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यावर रात्री नदीपात्रात झोपलेल्या एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. जलालपूर परिसरातील नदीपात्रात असलेल्या बाणेश्वर मंदिराजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. अंकुश ददरे (३०) आणि त्याचा मित्र दीपक पवार (२७, दोघेही राहणार ओढत बाजार) हे दोघे महादेवपूर ग्रामपंचायतीच्या विहिरीचे खोदकाम करत होते. खोदकाम करत असताना रात्री उशीर झाल्याने दोघेही गोदावरी नदीपात्रातच झोपून गेले.
गोदावरी नदीपात्रात रात्री अचानक आवर्तनामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली. रात्री हे अंकुशच्या लक्षात आले नाही. सकाळी जलालापूर गावाजवळील बाणेश्वर मंदिर परिसरात नदीपात्रात त्याचा मृतदेह तरंगतांना आढळला. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा…नाशिक : राष्ट्रीय लोक न्यायालयात ११ हजारहून अधिक प्रकरणे निकाली, ७९ कोटींचे तडजोड शुल्क वसूल
दुसऱ्या घटनेत, सुरगाणा तालुक्यातील खोकरतळे येथील तुकाराम राऊत (३६) यांचा प्रतापगड शिवारातील बेहेडमाळ तळ्याच्या पाण्यात पडून मृत्यू झाला. या प्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तिसऱ्या घटनेत चांदवड तालुक्यातील दहेगांव शिवारात हरिन्द्र कुमार मुन्ना बिंद (२४) यांचे प्रेत शेतातील विहिरीत तरंगतांना आढळले. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.