नाशिक : तपोवन भागात रात्री प्लायवूडच्या गोदामाला लागलेली भीषण आग नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल आठ तास अग्निशमन दलास शर्थीने प्रयत्न करावे लागले. आगीची तीव्रता इतकी होती की, महानगरपालिकेचे पाण्याचे १२ बंब अविरत फेऱ्या मारूनही कमी पडले. त्यामुळे आसपासच्या भागातील अतिरिक्त सहा बंब मागवले गेले. या दुर्घटनेत जिवितहानी झाली नाही. परंतु, गोदाम पूर्णत भस्मसात झाले.

तपोवन रस्त्यावर विस्तीर्ण भूखंडावर पत्र्याच्या शेडमध्ये लोकेश लॅमिनेट्स हे प्लायवूडचे गोदाम आहे. या गोदामाच्या आसपासच्या भागात काही निवासी इमारतींचे काम प्रगतीपथावर आहे. रात्री बारा वाजेच्या सुमारास गोदामास आग लागल्याचे लक्षात आले. उमेश मनचंदीया यांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलास कळवली. पंचवटी अग्निशमन केंद्रातील जवान घटनास्थळी दाखल झाले.

गोदामात सर्वत्र अतिशय मोठ्या प्रमाणात प्लायवूड असल्याने काही वेळात आगीचा मोठा भडका उडाला. आगीचे उंचच उंच लोळ व धूर दुरवरून दृष्टीपथास पडत होते. आगीचे भीषण स्वरुप लक्षात घेत महानगरपालिकेच्या सहाही केंद्रांवरून पाण्याचे सर्व १२ बंब मागवून घेण्यात आले. अग्निशमनचे अधिकारी व जवान असे ३० जण रात्रभर तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी धडपडत होते. नंतर एचएएल. चलार्थपत्र मुद्रणालय, पिंपळगाव बसवंत, अंबड मऔविम व सिन्नर नगरपालिका यांचेही सहा बंब मागविण्यात आले. सकाळी आगीवर काहीअंशी नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

आता शीतकरण प्रक्रिया

आग आटोक्यात आली असली तरी धग मात्र कायम आहे. घटनास्थळी जेसीबीने उकरून शीतकरणाची (कुलिंग) प्रक्रिया केली जाणार असल्याचे अग्निशमन दलाचे के. बी. पाटील यांनी सांगितले. आगीत प्लायवूडचे संपूर्ण गोदाम भस्मसात झाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मोकळ्या जागेत जमिनीवर गोदाम होते. त्यामुळे तिच्यावर नियंत्रण मिळवताना अडचणी आल्या नाहीत. परंतु, ज्वलनशील लाकूड, प्लायवूडच्या मोठा साठा असल्याने ती आटोक्यात आणताना दमछाक झाल्याचे सांगितले जाते.