नाशिक : शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीलगतच्या चुंचाळे शिवारात पहाटे भंगारच्या गोदामांना भीषण आग लागली. यात लाखो रूपयांचे साहित्य भस्मसात झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
चुंचाळे शिवारातील अनधिकृत भंगार बाजार मागील काही वर्षांपासून चर्चेत आहे. न्यायालयाच्या आदेशाने त्यावर एकदा कारवाई झाली होती. पण कालांतराने काही भंगार दुकाने व गोदामे पुन्हा कार्यान्वित झाली. याच परिसरातील दत्तनगर भागात ही घटना घडली. पहाटे दोनच्या सुमारास एका गोदामाला आग लागली. काही वेळात ती आसपासच्या गोदामात पसरल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा : नाशिक : नानेगावजवळ बिबट्या जेरबंद
या गोदामालगत आनंदवाटीका गृहप्रकल्प आहे. अकस्मात भडकलेल्या आगीने परिसरात एकच धावपळ उडाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका हद्दीतील सर्वच अग्निशमन केंद्रावरील आठ ते नऊ बंब घटनास्थळी दाखल झाले. अंबड व सातपूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा : नाशिक : ओबीसी हक्कांसाठी आता समता परिषद मैदानात, उत्तर महाराष्ट्रात मेळावे घेण्याची घोषणा
आगीत कुठल्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही. पण वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगितले जाते. आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अद्याप सुरू असल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले.