नाशिक : गोदावरी नदी स्वच्छता मोहिमेवर आजवर प्रचंड खर्च होऊनही ती स्वच्छ का झाली नाही, असा प्रश्न करुन प्रशासनाने या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप मनसेने केला आहे. प्रशासनाच्या कार्यशैलीमुळे गोदावरीचे पावित्र्य संकटात सापडले असून गोदावरी प्रदूषणाच्या मुद्यावरून शेतकरी, साधू-संत यांना बरोबर घेऊन आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

मागील महिन्यात मनसेच्या एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी देशातील एकही नदी स्वच्छ नसल्याचा उल्लेख करुन कुंभमेळ्यात भाविकांनी स्नान केलेल्या नदीचे पाणी कोण प्राशन करेल, श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही, असे प्रश्न उपस्थित केले होते. राज ठाकरे यांच्या विधानाचे स्थानिक पातळीवर पडसाद उमटले होते. अलिकडेच अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत राज ठाकरे यांच्यासह राजकीय नेत्यांना धर्माविषयी बोलण्यास प्रतिबंध करण्याचा ठराव करण्यात आला होता.

या घटनाक्रमानंतर मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, उपाध्यक्ष सलीम शेख, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम आदींनी पत्रकार परिषद घेऊन गोदावरी प्रदूषणाच्या बिकट स्थितीवर बोट ठेवले. गोदावरीच्या काठावर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा होतो. लाखो भाविक स्नान करतात. याच गोदावरीच्या माध्यमातून लाखोंची तहान भागविली जाते. गोदावरीच्या पाण्यावर अनेकांची उपजिविका, उद्योग, व्यवसाय अवलंबून आहेत.

गोदावरीवर अतिक्रमण होत आहे. उद्योग व्यवसायातील काही बलाढ्य लोकांकडून कारखान्यातील दूषित पाणी गोदावरीत सोडण्यात येते. ज्या गोदावरीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन केले जाते, त्याच नदीचे पाणी पिण्यायोग्य नाही. वाढत्या प्रदूषणाने जीवितास व शेती व्यवसायात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात, याकडे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

….तर प्रशासन जबाबदार

या प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, भविष्यात गोदावरीच्या दूषित पाण्याचा कोणाला त्रास झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा पाटील आणि शेख यांनी दिला आहे. गोदावरीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी केलेल्या उपाय योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे सुधारणा झाली नाही, असा आरोपही करण्यात आला. झोपलेले प्रशासन कधी जागे होणार, असा प्रश्न करुन मनसेतर्फे आंदोलन छेडले जाणा्र असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.