नाशिक : मनसेच्या १८ व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने पक्षाने अध्यक्ष राज ठाकरे यांचा ‘भावी मुख्यमंत्री‘ म्हणून उल्लेख करत राज्याच्या राजकारणात पुन्हा आपली पकड मजबूत करण्याची धडपड चालवली आहे. राज यांच्या स्वागतासाठी पाथर्डी फाटा परिसर भगवामय करण्यात आला आहे. दौऱ्यात राज हे पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात आरती आणि मुंबई नाका येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या दोन्ही परिसरासह प्रमुख रस्ते, चौक स्वागत फलकांनी भरून गेले आहेत. दुसरीकडे शहर, ग्रामीण भागातील रस्त्यांवर सत्ताधारी भाजपने ‘अब की बार मोदी सरकार’ अशा भिंती रंगवत प्रचाराला सुरुवात केली असून त्यास काँग्रेसने ’अब की बार रोजगार दो‘ अशा भिंती रंगवून प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून नाशिक लोकसभेची जागा नेमकी कुणाच्या पदरात पडणार, याची स्पष्टता झालेली नाही. मनसेही महायुतीत सहभागी होण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना ठाकरे गटाने श्रीराम भूमी नाशिकमधून प्रचाराचे रणशिंग याआधीच फुंकले आहे. मनसेकडून काहिसे तसेच अनुकरण होत आहे. या दौऱ्यात राज ठाकरे हे शुक्रवारी सकाळी पंचवटीतील श्रीकाळाराम मंदिरात आरती करणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी दादासाहेब गायकवाड सभागृहात होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात ते संवाद साधतील. वर्धापन दिन सोहळ्यातून मनसेने जोरदार शक्ती प्रदर्शनाचे नियोजन केले आहे. राज यांची प्रतिमा भावी मुख्यमंत्री म्हणून जनतेसमोर नेण्याचा पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. गुरुवारी सायंकाळी राज यांचे शहरात आगमन होणार आहे. पाथर्डी फाटा येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. हा संपूर्ण परिसर भगवामय करण्यात आला आहे. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले जाईल. या ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे यांची भव्य प्रतिमा असणारा फलक उभारला गेला आहे. महाराष्ट्राची ब्लू प्रिंट समोर आणणारे राज ठाकरे हे एकमेव नेते आहेत. राज्याचा विकास ते करू शकतील. जनतेच्या मनातील ते मुख्यमंत्री आहेत. त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जिवाचे रान केले जाईल, असे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

हेही वाचा : नाशिक : महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी चोवीस तास खुले

कधीकाळी नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला होता. महानगरपालिकेची सत्ताही पक्षाकडे होती. नंतर मात्र अनेक लोकप्रतिनिधी व नगरसेवकांनी पक्षांतर केल्याने पक्षाची बिकट अवस्था झाली. राज यांनी मधल्या काळात नाशिककडे दुर्लक्ष केले होते. राज्यातील बदलती समीकरणे लक्षात घेऊन मनसे पुन्हा सक्रिय झाली आहे. आगामी निवडणुकीत महायुतीला मनसे साथ देणयाची चिन्हे आहेत. या स्थितीत राज यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी धडपडत आहेत. राज हे श्री काळाराम मंदिर आणि मुंबई नाका येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात जाणार आहेत. या दोन्ही ठिकाणांसह प्रमुख रस्त्यांवर स्वागत फलक व भगव्या झेंड्यांनी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेची नेमकी काय भूमिका असणार, याची स्पष्टता होण्याची शक्यता पदाधिकारी वर्तवितात.

हेही वाचा : युवा संमेलनात अमित शहा यांचा ‘राजकीय सूर’

भाजपच्या जाहिरातींना काँग्रेसकडून उत्तर

शहर व ग्रामीण भागातील रस्त्यालगतच्या भिंती, झाडांभोवतीचे पार (कट्टे) व तत्सम ठिकाणी ’अब की बार मोदी सरकार‘ असा उल्लेख करत भाजपने प्रचार सुरू केला आहे. सावरकरनगर भागातील काँक्रिटच्या रस्त्यावरील झाडांभोवती नागरिकांना बसण्यासाठी कट्टे करण्यात आले आहेत. त्यांच्या भिंतींवर भाजपच्या जाहिराती झळकल्या आहेत. लोकांना बसण्यासाठी हे कट्टे आहेत की प्रचाराची जागा, या ठिकाणी इतर व्यावसायिकांनी जाहिराती लावल्या तर चालतील का, असा प्रश्न काही स्थानिकांनी उपस्थित केला. भाजपच्या जाहिरातींना काँग्रेसने भिंती रंगवून प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. भाजपच्या जाहिरातींपुढे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयेश पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अब की बार रोजगार दो, अब की बार न्याय दो‘ असे लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. युवक काँग्रेसने ठिकठिकाणी तसे कामही सुरू केले आहे. यात सरचिटणीस पंकज सोनवणे, प्रवक्ता महेश देवरे, देवेन मारू, त्र्यंबकेश्ववर तालुका अध्यक्ष गणेश कोठुळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाल्याचे युवक काँग्रेसकडून सांगण्यात आले. या घटनाक्रमाने पुढील काळात जाहिरातींमधील द्वंद मतदारांना अनुभवयास मिळणार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik mns chief raj thackeray s banner of future chief minister on mns 18 th foundation day css
Show comments