नाशिक : दिवाळीत आवाजाच्या तीव्रतेचे मोजमाप करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काम हाती घेतले असले तरी हवेतील प्रदूषण मापनात मात्र अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. कुठल्याही भागातील हवेतील प्रदूषण मोजण्यासाठी मंडळाच्या नाशिक विभागाकडे उपलब्ध झालेल्या फिरत्या वातावरणीय हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्राला (प्रयोगशाळेला) कार्यान्वित राखण्यासाठी किमान २४ तास वीज लागते. सार्वजनिक ठिकाणी तशी व्यवस्था होत नसल्याने ऐन दीपावलीत वेगवेगळ्या भागातील प्रदूषण जोखणे अवघड झाले आहे. अथक प्रयत्नांनी या फिरत्या केंद्राला मालेगाव स्टँड परिसरात पहिल्यांदा मापन शक्य झाले. लक्ष्मीपूजनच्या दिवशी सायंकाळपर्यंत विजेची व्यवस्था कुठे होईल, यासाठी धडपड सुरू होती.
दिवाळीच्या कालावधीत ध्वनी आणि हवा प्रदूषणाचे मापन करण्याची तयारी प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली असली तरी फिरत्या प्रयोगशाळेद्वारे हवेतील प्रदूषण मोजताना दमछाक होत आहे. दिवाळीत रात्री बारा ते सकाळी सहा या वेळेत फटाके वाजविण्यावर प्रतिबंध आहे. अनेक ठिकाणी त्याचे उल्लंघन होते. ध्वनीची पातळी सर्वसाधारणपणे ५५ ते ६० डेसिबलपर्यंत असते. वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या कारणांमुळे या पातळीत चढ-उतार होतो. अधिकाधिक ८० डेसिबलपर्यंतचा आवाज सहन केला जाऊ शकतो. त्या पुढील तीव्रतेचा आवाज सहन करण्यापलीकडे जातो.
हेही वाचा : नाशिकमध्ये फटाक्यामुळे लागलेल्या आगीत दुकान भस्मसात, मध्यवर्ती बाजारपेठेतील दुर्घटना
दिवाळीत फटाक्यांमुळे ही पातळी १०० डेसिबलच्या पुढे जाऊ शकते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील प्रमुख ठिकाणी फटाक्यांच्या आवाजाचे ध्वनिमापन केले जात असल्याचे या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. लक्ष्मीपूजन व तत्सम दिवशी प्रमुख बाजारपेठांमध्ये पाच ते १० हजारांच्या माळांवर अधिक भर असल्याने हा परिसर आवाजाने दुमदुमून जातो. निवासी भागात आवाजापेक्षा ‘फॅन्सी’ प्रकारांना पसंती दिली जाते. ध्वनि प्रदूषण मापनासाठी शांतता क्षेत्र, रहिवासी भाग, औद्योगिक क्षेत्र अशा वेगवेगळ्या परिसराची निवड केली आहे.
याच धर्तीवर हवेतील गुणवत्ता पडताळणी फिरत्या गुणवत्ता निरीक्षण केंद्रामार्फत केली जाणार आहे. हे मापन करण्यासाठी प्रदूषण मंडळाकडे चार जिल्ह्यांसाठी मिळून एक फिरते वातावरणीय हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्र अर्थात वाहनातील प्रयोगशाळेची उपलब्धता झाली आहे. मंडळाची काही विशिष्ठ ठिकाणी स्थायी स्वरुपाची निरीक्षण केंद्रे आहेत. दिवाळीत फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता पूर्णत: बदलण्याचा संभव आहे. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या भागात हवेची गुणवत्ता मापनाचे केलेले नियोजन वीज उपलब्धतेअभावी प्रत्यक्षात येत नसल्याचे चित्र आहे. या मापनासाठी निरीक्षण केंद्रातील उपकरणांना किमान २४ तास नोंदी घ्याव्या लागतात. त्यासाठी तितका वेळ वीज उपलब्ध होण्याची आवश्यकता असते. आतापर्यंत दिवाळीत तशी व्यवस्था केवळ शुक्रवारी मालेगाव स्टँड येथे होऊ शकली. लक्ष्मी पूजनच्या दिवशी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी झाली. सकाळपासून मंडळाचे अभियंते, कर्मचारी एखाद्या भागात सलग २४ तास वीज उपलब्ध होईल का, याची छाननी करत होते. सायंकाळपर्यंत तशी व्यवस्था झाली नव्हती. त्यामुळे फिरत्या केंद्रामार्फत हवेतील प्रदूषणाचे मापन अधांतरी झाल्याचे चित्र आहे. या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यास दुजोरा दिला.
हेही वाचा : जळगावात गुटख्यासह १९ लाखांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
आधीच्या अभ्यासातील निष्कर्ष काय ?
उद्योग, वाहतूक, रस्त्यावरील धुळ, वीटभट्ट्या, बांधकाम, स्टोन क्रशर, स्मशानभूमी, बेकरी अशा जवळपास ११ क्षेत्रांमधून होणाऱ्या उत्सर्जनामुळे शहर आणि ग्रामीण भागात हवेतील प्रदूषण वाढण्यास हातभार लागल्याचे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी), ऊर्जा व संसाधन संस्था (टेरी) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) यांच्या सहकार्याने केलेल्या अभ्यासातून मध्यंतरी उघड झाले होते. कधीकाळी स्वच्छ हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकची ही ओळख धुलीकणांसह अन्य वायुंमुळे अडचणीत येण्याच्या मार्गावर आहे. धुलीकण आणि धोकादायक वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रभावीपणे काम केल्यास नाशिकच्या हवेची गुणवत्ता उंचावता येईल, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले होते.
हेही वाचा : जळगावात सराफ बाजाराला झळाळी, सोन्याची मागील वर्षापेक्षा २५ टक्के अधिक विक्री
शहरातील सिडको, सातपूर गाव, मुंबई नाका, आणि कोणार्कनगर ही सुक्ष्म धुलीकणाची प्रमुख ठिकाणे ठरली आहेत. शहरात मुख्यत्वे लोकसंख्येची घनता, बांधकाम आणि वाहनांची घनता यामुळे धुलीकरणांचे उत्सर्जन होते. शहरात वाहनांमधून बाहेर पडणारा धूर आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रक्रिया यामुळे नायट्रोजन ऑक्साईड्सचे उत्सर्जन होत आहे. महामार्गांवरही वेगळी स्थिती नाही. ग्रामीण भागात कच्चे रस्ते, वाहनांची वाढती संख्या, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे लाकूड व तत्सम इंधनाचे ज्वलन आदींमुळे धुलीकरणांची तीव्रता वाढते. सर्वसाधारण काळातील हवेतील प्रदूषणाची पातळी दिवाळीत कोणती पातळी गाठत असेल, हा प्रश्न आहे.