नाशिक : सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी बांगलादेशमध्ये हिंदुंवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला हिंसक वळण लागून दगडफेक, वाहनांची तोडफोड असे प्रकार घडले. पोलिसांकडून दोन्ही गटातील संशयितांची धरपकड सुरू असून २० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पंचवटी, भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. नियोजित मार्गाऐवजी मोर्चा अन्य मार्गावरून निघाल्याचे म्हटले जात आहे. मोर्चेकऱ्यांकडून दुकाने बंद करण्यास सांगण्यात येत असता जुने नाशिक, भद्रकाली भागात काहींनी दुकाने बंद करण्यास विरोध केला. त्यामुळे वाद वाढून दोन्ही गटांकडून दुकानांची तोडफोड, घरांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार तसेच अश्रुधुराचा वापर करण्यात आला.
हेही वाचा : जुने नाशिक, भद्रकालीत स्थिती पूर्वपदावर, पालकमंत्र्यांकडून पोलिसांचे कौतुक
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाची पाहणी करत संशयितांची धरपकड सुरू केली. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेला आवाहन देणाऱ्या दोन्ही गटातील २० हून अधिक संशयितांवर पंचवटी तसेच भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शांतता समितीची बैठक बोलवून झालेल्या प्रकाराविषयी चर्चा करण्यात आली. पालकमंत्री दादा भुसे यांनीही आढावा बैठक बोलवत कायदा व सुव्यवस्थेला आवाहन देणाऱ्यांना पाठीशी घालण्यात येणार नाही, असा इशारा दिला. शनिवारी तणाव निवळला असला तरी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात होता.