नाशिक : नाशिकरोड ते द्वारका हा रस्ता वाढत्या वाहतुकीमुळे अत्यंत जीवघेणा झाला असून या मार्गावर उड्डाणपूल व्हावा ही १५ वर्षांपासूनची मागणी अद्याप प्रलंबित आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांनी पुन्हा एकदा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत या प्रकल्पासंदर्भात साकडे घातले.
हेही वाचा : जल्लोषातून पालकमंत्रिपदावर दावा, भाजपची अजित पवार गटाला शह देण्याची तयारी
आगामी कुंभमेळ्याआधी नाशिकरोड-व्दारका उड्डाणपूल प्रकल्प पूर्ण होण्यासाठी खासदार वाजे आग्रही असून त्याबाबत त्यांनी संसदेच्या पहिल्याच अधिवेशनापासून पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे. हा उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी १५ वर्षांपासून केली जात आहे. परंतु, सातत्याने ती प्रलंबित राहिली आहे. याआधी शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनीही या उड्डाणपुलासंदर्भात पाठपुरावा केला होता. परंतु, कोणतीच कार्यवाही झाली नाही. बुधवारी खासदार वाजे यांनी गडकरी यांची भेट घेत या प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणी केली. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा वाजे यांच्याकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात आपण वारंवार गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचेही वाजे यांनी नमूद केले.