नाशिक: महायुतीच्या मंत्रिमंडळातील मंत्री काम करीत नाहीत. मंत्रालयात येत नाहीत. आमदारांसह जनतेची कामे मार्गी लावत नाहीत. मंत्र्यांचे काय सुरू आहे, हे त्यांनाही माहिती नाही. विधानसभा निवडणूक जवळ आली असताना मंत्र्यांनी फाईल अडवण्याचा प्रयत्न केला तर, भविष्यकाळ सर्वांच्या दृष्टीने वाईट आहे. आम्ही मंत्रिमंडळात नाही. उलट त्यांना रस्त्यावर यावे लागेल, असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे यांनी सर्व मंत्र्यांना सुनावल्याने महायुतीतील खदखद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने आपली अस्वस्थता वारंवार अधोरेखीत करणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ आता याच पक्षाचे सिन्नरचे आमदार कोकाटे यांनी माध्यमांशी संवाद साधताना महायुतीच्या मंत्र्यांकडून परस्परांच्या फाईल रोखण्याचा प्रकार होत असल्याकडे लक्ष वेधले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्यात वाद झाल्याचे सांगितले जाते. सिन्नर मतदारसंघातील वासाळी येथे आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक उभारण्याचे नियोजन आहे. दोन वर्षांपूर्वी प्रकल्प अहवाल तयार होऊनही त्यास निधी मिळालेला नाही. या विषयावर उपमुख्यमंत्री पवार आणि पर्यटनमंत्री महाजन यांच्यात खडाजंगी झाल्याचे बोलले जाते.
हेही वाचा : नरहरी झिरवाळ यांचा मुलगा शरद पवार गटाच्या व्यासपीठावर – वडिलांनाही परतण्याची साद
मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय चर्चा झाली, त्याविषयी आपणास माहिती नाही. आमदार निधीविषयी वाद झाला नाही. आपल्या मतदारसंघातील स्मारकाचा हा वाद असेल तर, तो चुकीचा असल्याचे कोकाटे यांनी नमूद केले. या स्मारकाचे महत्व समजून घेतले पाहिजे. चार ते पाच विधानसभा मतदारसंघांच्या सीमेवर हे स्मारक झाल्यास त्याचा महायुतीला फायदा होईल, याचा विचार झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
निवडणुकीला सामोरे जायचे असल्याने मंत्र्यांच्या कार्यपध्दतीविषयी उपमुख्यमंत्री पवार यांना वारंवार कल्पना दिली. वेगवेगळ्या पक्षांचे मंत्री त्यांच्याच आविर्भावात फिरतात. जबाबदार मंत्री म्हणून काम करायला तयार नाहीत. मंत्री म्हणून संधीचे सोने करण्याऐवजी ते राजकारण करीत असल्याचा आरोप कोकाटे यांनी केला. मंत्र्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. निवडणूक जवळ येत असताना ते कसली वाट बघत आहेत. याबाबत दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांची स्वतंत्रपणे बैठक घ्यावी. ज्या आमदारांची कामे प्रलंबित आहेत, त्या कामांचा त्वरित निपटारा करावा. मंत्र्यांनी नखरे केले, फाईल अडविण्याचे प्रयत्न केले तर, भविष्यकाळ वाईट असून अद्याप वेळ गेलेली नाही, मंत्र्यांनी सुधारणा करावी, आमदारांच्या फाईल मार्गी लावाव्यात, असे कोकाटे यांनी सूचित केले.