नाशिक: शहरातील उपेंद्र नगरातील रुद्र द प्रॅक्टिकल स्कुल या शाळेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षाच्या विद्यार्थिनीचा मंगळवारी सकाळी चक्कर आल्याने शाळेतच मृत्यू झाल्यानंतर धक्क्यातून विद्यार्थी आणि शिक्षक सावरले नसल्याने बुधवारी शाळा बंद ठेवण्यात आली. काही सामाजिक संघटनांच्या वतीने शाळेबाहेर निदर्शने करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उंटवाडी परिसरातील जगताप नगर येथील दिव्या त्रिपाठी ही मंगळवारी सकाळी शाळेत गेली होती. बरे वाटत नसल्याने आसनस्थळी ती डोके ठेवून बसली. नऊ वाजेच्या सुमारास चक्कर आल्याने बेशुध्द होऊन ती कोसळली. तिच्या पालकांना तातडीने कळविण्यात आले. वडील प्रितेश त्रिपाठी आणि शिक्षिका चैताली चंद्रात्रे यांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दिव्याच्या मृत्युनंतर इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा गाठत शाळेच्या इमारतींवरील भ्रमणध्वनी मनोरे काढण्याची मागणी केली. या मनोऱ्यांच्या लहरी विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा : विवाहितेची बाळासह शेततळ्यात आत्महत्या

दरम्यान, बुधवारी काही सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटनांनी शाळेबाहेर निदर्शने केली. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे काही कार्यकर्ते शाळेच्या आवारात धडकले. मुख्यध्यापकांनी पोलिसांशी संपर्क केल्यावर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संबंधित प्रकाराबाबत पालकांची तक्रार नसून ते आमच्याबरोबर असल्याचा दावा शाळा व्यवस्थापनाने केला. पालकांची तक्रार असलेल्या भ्रमणध्वनी मनोऱ्यां विषयी शाळा व्यवस्थापनाने बोलणे टाळले.

हेही वाचा : सिडकोतील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

शाळेबाहेर पालकांनी आंदोलन केलेले नाही. उलट कालच्या घटनेनंतर पालकांकडून आम्ही शाळेबरोबर असल्याचे सांगितले गेले. बुधवारी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे काही लोक शाळेत येऊन काही कागदपत्रांची मागणी करत होते. त्यावरून वाद झाले. पोलिसांना या विषयी माहिती दिली. कालच्या घटनेमुळे मुले हादरली आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांकडून सुट्टीची मागणी होत आहे. परीक्षा सुरू असतानाही मुले मानसिक धक्क्यातून सावरावीत, यासाठी शाळेला सुट्टी दिली आहे.

स्मिता चौधरी (मुख्याध्यापक)
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik ncp student wing agitation after the death of girl student of rudra the practical school css