नाशिक : मराठवाड्यातील बिअरचे कारखाने बंद करा, मगच नाशिकचे पाणी सोडण्याचा विचार करा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती बघता पाण्याचा अपव्यय होऊ नये, पाण्याचे सूक्ष्म नियोजन व्हावे, यासाठी मराठवाड्यातील बिअर कारखाने बंद झाल्यानंतरच नाशिकचे पाणी जायकवाडीमध्ये सोडण्याचा विचार करावा, असे खैरे यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदा नाशिक जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाला असून धरणातील पाणीसाठा मुबलक नसल्याने नांदगाव, येवला, सिन्नर हे तालुके दुष्काळग्रस्त झाले आहेत. नाशिकमधील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याची मागणीही वाढताना दिसत आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठा नाशिककरांसाठी कमी पडत असल्याने काश्यपी, गौतमी या धरणांतील पाण्यावर गरज भागवावी लागत आहे. शेतीसाठी मुबलक पाणी नसल्याने एक-दोन महिन्यात टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सद्यस्थितीत नाशिकमधील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नाही. त्यातच गंगापूर धरणातील पाणी सोडल्यास उन्हाळ्यात नाशिककरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल, असे खैरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा : महाआवास अभियानात विशेष राज्यस्तरीय पुरस्कारांत जळगावचा ठसा, विविध गटांत प्रथम, द्वितीय, तृतीय स्थानी

जिल्ह्यातील अनेक गावात सद्यस्थितीत टँकरने पाणी पुरवठा होत आहे. मराठवाड्यात जायकवाडी धरणातील पाण्याचे नियोजन नसल्याने नाशिक, अहमदनगरमधील ८.६ टीएमसी पाण्याचा पुरेपूर फायदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा आणि डीएमआयसी करमाड, बिडकीन या औद्योगिक वसाहतींतील बिअर कारखान्यांना आणि मोठ्या कंपन्याना होणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील बिअर कारखाने बंद करून जायकवाडी धरणातील पाण्याचे सूक्ष्म नियोजन केल्यावरच नाशिकचे पाणी सोडण्याचा विचार करावा, असे खैरे यांनी नमूद केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik ncp youth congress city president ambadas khaire demand shut down liquor companies of marathwada to release water in jayakwadi dam css
Show comments