नाशिक : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ओझर येथील नवविवाहितेने घरासमोरील विहिरीत आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात ओझर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आकांक्षा मंडलिक (२६) दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार कुटूंबियांकडून चार जानेवारी रोजी ओझर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. आकांक्षाचा मृतदेह बाणगंगा नगरातील मंडलिक वस्तीतील विहीरीत आढळून आला. सात महिन्यापूर्वी तिचा विवाह झाला होता.
हेही वाचा : नववर्षात जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी-कर्मचारी गणवेशात, जलज शर्मा यांच्यासह मनिषा खत्री यांचीही पायी भ्रमंती
वैभव जगझाप (३४, रा. पालखेड मिरचीचे) यांच्या तक्रारीनुसार, आकांक्षाचे पती विजय मंडलिक, सासरे पुंडलिक मंडलिक, सासू ठकुबाई मंडलिक आणि नणंद सुवर्णा मंडलिक या सासरकडील मंडळींनी आकांक्षाचा लग्नाच्या दोन महिन्यानंतर शारीरिक, मानसिक छळ करुन मारहाण केल्याचे म्हटले आहे. माहेरून १० लाख रुपये घेऊन येण्यास तिला सांगण्यात येत होते. सासरकडील मंडळींनीच आकांक्षाला आत्महत्येस प्रवृत्त केले, असे तक्रारीत म्हटले आहे. ओझर पोलीस ठाण्यात जगझाप यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.