लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर शनिवारी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे अजित पवार हे प्रथमच नाशिक दौऱ्यावर येत आहेत. दिमाखदार सोहळ्यातून जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली आहे. पण, नव्याने सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी आणि दुखावलेल्या शिंदे गटाचा सुप्त संघर्ष समोर येत आहे. उपरोक्त कार्यक्रमही त्याला अपवाद ठरला नाही. नियोजनापासून मंत्री छगन भुजबळ हे अलिप्त राहिले आहेत. राष्ट्रवादीने कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून दादा भुसे यांच्यावर ढकलल्याचे चित्र आहे.

शनिवारी सकाळी ११ वाजता गंगापूर रस्त्यावरील डोंगरे वसतिगृह मैदानात होणाऱ्या या कार्यक्रमाची युध्दपातळीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहर व ग्रामीण भागातून तब्बल २५ हजार लाभार्थ्यांना सहभागी केले जाणार आहे. रस्त्यांवर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे झेंडे व संपूर्ण शहरात फलकांनी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. या निमित्ताने शक्ती प्रदर्शन करीत विरोधकांना शह देण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर प्रथमच येथे येणाऱ्या अजित पवार यांचे स्वागत दणक्यात करण्याची तयारी केली आहे. पवार यांचे वंदे भारत एक्स्प्रेसने सकाळी नाशिकरोड स्थानकात आगमन होईल. नाशिकरोड ते शासकीय विश्रामगृह अशी दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे.

हेही वाचा… अजित पवारांनी केला ‘वंदे भारत’ रेल्वेतून प्रवास…प्रवासी म्हणाले, ‘अजितदादा म्हणजे कामाचा…’

कार्यक्रमात कोणतीही उणीव राहू नये, याकरिता पालकमंत्री भुसे यांनी सर्व विभागांना कार्यप्रवण केले. अतिशय सुक्ष्म पातळीवर नियोजन करीत तो भव्य दिव्य स्वरुपात होईल, याची काळजी घेण्यात आली आहे. पण, यापासून नवीन मंत्री छगन भुजबळ यांनी अंतर राखले आहे. या संदर्भातील बैठक वा अन्य कुठल्याही गोष्टीत भुजबळांसह राष्ट्रवादीच्या आमदारांनी लक्ष घातले नाही. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून भुसे-भुजबळ यांच्यातील स्पर्धा त्यास कारक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या कार्यक्रमाचा अधिकाधिक राजकीय लाभ घे्ण्याचा तीनही पक्षांचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात इगतपुरी वगळता सर्व १४ मतदारसंघ सत्ताधारी पक्षांच्या ताब्यात आहेत. या कार्यक्रमातून आपापला राजकीय खुंटा मजबूत करण्याचा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न आहे.

प्रशासनाची कसोटी

कार्यक्रमात शहर व ग्रामीण भागातून २५ हजार लाभार्थ्यांना आणले जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातून त्यांची जमवाजमव करण्यापासून वाहतूक व भोजन व्यवस्था, कार्यक्रमस्थळी स्वच्छता, पिण्याचे पाणी, फिरते स्वच्छतागृह, शोभेच्या झाडांची रचना, रांगोळी, ठिकठिकाणी एलईडी पडदे, ग्रीनरुम, व्यासपीठ अशी संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आहे. अल्पावधीत तयारी करून कार्यक्रम यशस्वी करताना प्रशासनाची कसोटी लागली आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून संपूर्ण यंत्रणा या कामांत गर्क आहे.

पावसाचे सावट

शासन आपल्या दारी कार्यक्रमावर पावसाचे सावट आहे. पावसाचा व्यत्यय येऊ नये म्हणून भव्य जलरोधक तंबू उभारले गेले असले तरी पाऊस आल्यास उपस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी अधुनमधून पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने शनिवारी मध्यम पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हलक्या पावसात मैदान चिखलमय होते. हे टाळण्यासाठी खडी, डबर टाकून रोडरोलरने जमीन समतल करण्याची दक्षता घेण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी आठ ते १० भव्य जलरोधक तंबू उभारण्यात आले. त्यावरून पडणारे पावसाचे पाणी चारीतून जाईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik now its ajit pawars turn to give answer to sharad pawar but chhagan bhujbal is keeping a distance dvr