Nashik Onion Price: कांद्यावरील निर्यात शुल्क हटविल्यानंतरही घाऊक बाजारात नकारात्मक वातावरण पाहण्यास मिळत असून कांदा दरात प्रति क्विंटल २५० रुपयांनी घसरण होऊन बुधवारी ते १२५० रुपयांपर्यंत आले. निर्यात शुल्क रद्द करण्यात कालापव्यय झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केला आहे. तर रमजान ईदच्या सुट्टीमुळे परदेशातून चालू आठवड्यात मागणी नसल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे.
मार्च अखेरीस केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला. एक एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. परंतु, दरात सुधारणा होण्याऐवजी ते आणखी गडगडले. बुधवारी लासलगाव बाजार समितीत सुमारे १२ हजार क्विंटलची आवक झाली. त्यास सरासरी १२५० रुपये भाव मिळाला. २७ मार्च रोजी हे दर दीड हजार रुपये होते. निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने दिरंगाई केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. २२ मार्चला घेतलेल्या निर्णयाची एक एप्रिलला अंमलबजावणी केली गेली, याकडे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने लक्ष वेधले.
आखाती देश, मलेशिया, इंडोनेशिया ही भारतीय कांद्याची प्रमुख बाजारपेठ आहे. या देशांमध्ये रमजान ईदची साप्ताहिक सुट्टी असल्याने सध्या भारतीय कांद्यास लगेचच मागणी नाही. पाकिस्तानकडून बहुतांश भागात कांदा निर्यात केला जातो. ती बाजारपेठ हळूहळू ताब्यात येण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागेल. एप्रिलपर्यंत भारतीय कांद्याला मागणी येण्याची शक्यता आहे.
विकास सिंग (निर्यातदार)
जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी केंद्र सरकारने आता निर्यातीवर अनुदान आणि दरात सुधारणा होण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात अन्यथा संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल.
भारत दिघोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना)