नाशिक: गंगाघाट सुशोभीकरणाच्या नावाखाली स्मार्ट सिटी कंपनी आणि महानगरपालिका यांच्याकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येणार असून याला नाशिक वाचवा कृती समितीने विरोध दर्शविला आहे. पूर नियंत्रण रेषेत मोठ्या प्रमाणावर सिमेंटचे ठोकळे टाकून गंगाघाट हा अरुंद आणि चोपडा करण्यात येत आहे. यामुळे गंगाघाटाचे पात्र कमी होणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतःच्या खर्चातून बांधलेला हा काळ्या पाषाणातील घाट अतिशय सुंदर आखीवरेखीव आहे. स्मार्ट सिटी कंपनी सौंदर्यीकरणाच्या नावाखाली चांगल्या अवस्थेतील घाट नेस्तनाबूत करून सिमेंट काँक्रिटचे ठोकळे अंथरुन घाटाच्या सौंदर्याला गालबोट लावत आहेत, असा आरोप नाशिक वाचवा कृती समितीने केला आहे.
हेही वाचा : नाशिक: विवाहितेसह आईला मारहाण करुन अटक; महिला निरीक्षकासह सात महिला अंमलदार दोषी
पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी स्वखर्चातून बांधलेल्या घाटाला कोणी नेस्तनाबूत करत असेल तर तो त्या स्मारकांचा अपमान आहे. आम्ही नाशिककर नागरिक या विषयाशी अतिशय संवेदनशील असून आमच्या भावनांशी स्मार्ट सिटी कंपनी आणि शासनाने खेळू नये. ठेकेदारांसाठीच काही कारण नसताना अशा पद्धतीचा सुंदर मजबूत घाट तोडून अपघाताला आमंत्रण देणाऱ्या व शेवाळे होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या या कामाला ताबडतोब स्थगिती द्यावी, अशी मागणी कृती समितीच्या वतीने राजेंद्र बागूल, कल्पना पांडे, उल्हास सातभाई, सुनील महकाळे ,आकाश छाजेड, उद्धव पवार आदींनी केली आहे.