नाशिक – गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या इतकी मोठी आहे की, त्यांना एकत्रित केल्यास एखादा पक्ष उभा राहील. मुंडे यांचे गुण आत्मसात केल्यामुळे ही सर्व मंडळी आपल्याशी जोडली गेली, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन ट्रस्ट, कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्यावतीने येथे आयोजित कृषी महोत्सवात रविवारी पर्यावरणमंत्री मुंडे यांच्या हस्ते शेतीत विविध उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांसह संस्थांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांनी सांगितलेल्या मार्गावर काम केल्यामुळे लोकांनी आपल्याला स्वीकारल्याचे सांगितले. गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाच्या जन्मापासून काम करुन भाजप उभा केल्याकडे पंकजा यांनी लक्ष वेधले. पर्यावरण खाते मिळाल्यानंतर काहिशी साशंकता होती. आपण जनतेचे नेते आहोत, विविध कामांसाठी दररोज अनेक लोक भेटायला येतात. तेव्हा चार कामे इकडेतिकडे झाली तरी चालतील, पण सर्वांसाठी पर्यावरण चांगले राखणे महत्वाचे असल्याचे लक्षात घेऊन कामास सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले.

प्रयागराज येथील कुंभमेळ्यात जगभरातून लोक येत आहेत. तेथील सरकारवर मोठा ताण असूनही स्वच्छता व व्यवस्था देण्यात चांगले काम होत आहे. नाशिकच्या आगामी कुंभमेळ्यात परिस्थिती चांगली ठेवण्यासाठी काही जबाबदारी आपल्याकडे आली आहे. राज्यात २० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक कुठलेही बांधकाम करायचे असल्यास व्यावसायिकांना पर्यावरण विभागाची परवानगी घ्यावी लागते. प्रकल्प सुरू करण्यापूर्वी संबंधितांनी हरित क्षेत्राकडे लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी सूचित केले.

पशुसंवर्धन विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्यात ग्रामीण उद्योजक तयार करण्याची योजना लवकरच जाहीर केली जाणार आहे. कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगाराची संधी उपलब्ध होईल. पर्यावरण संवर्धनाचा भाग म्हणून स्वागतप्रसंगी पुष्पगुच्छाऐवजी बियांचे पाकीट देऊन स्वागत करण्याची संकल्पना राबविण्याचे निर्देश दिले जाणार असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.