नाशिक : जात, धर्म, भाषा, कला, संस्कृती यांचे उत्खनन आपण कधी करणार आहोत, यासंदर्भात पोषक वातावरण तयार होण्याची गरज असताना असे निर्भय वातावरण राजकीय मंडळी कधी उपलब्ध करून देणार, असा प्रश्न ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी उपस्थित केला आहे.

येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने काॅलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात सोमवारी जनस्थान पुरस्काराने ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये आणि सन्मानपत्र असे आहे.

आळेकर यांनी मनोगतात २०१४ नंतर राजकीय, सामाजिक परिस्थितीत स्थित्यंतर होत असतांना त्यास तोडीस तोड बदल साहित्य आणि नाटकातही होणे अपेक्षित होते, असे सांगितले. पाश्चात्य देशांमध्ये नाट्यक्षेत्रात असे बदल होत राहतात. २०१४ पूर्वी मणिपूरमध्ये राजकीय विषयांवर नाटक होत असत. आता ती निस्तेज झाली असल्याचे आळेकर यांनी नमूद केले. कुसुमाग्रजांशी झालेली पहिली ओळख, त्यांचे साहित्य, त्यांचा स्वभाव याचे आळेकर यांनी वर्णन केले. कुसुमाग्रजांकडे कधीही गेले तरी, त्यांचा दरबार भरलेला असे, अशी आठवण त्यांनी सांगितली. कुसुमाग्रजांचे कौंतेय नाटक आवडल्याचा उल्लेख करुन नाटकातील एक संवादही त्यांनी सादर केला.

डॉ. जब्बार पटेल यांनी आळेकरांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध, नाटकांशी संबंधित आठवणी सांगितल्या. आळेकरांचे महानिर्वाण, बेगम बर्वे या नाटकांनी देश आणि परदेशात इतिहास रचल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी मंचावर ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, सुरेश भटेवरा, मिलिंद मुरुगकर, प्रकाश होळकर आदी उपस्थित होते.

मराठीचा आवाज क्षीण होत असल्याची चिंता

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. परंतु, मराठीचा आवाज क्षीण होत आहे. मराठी साहित्याची विक्री आटत चालली आहे. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट अशी की, इंग्रजी माध्यमातील मुले मराठी वेबमालिका, नाटक, मालिकांमध्ये काम करत आहेत. नाटकालाही सुगीचे दिवस आले आहेत, असे आळेकर यांनी सांगितले.

आळेकरांना जनस्थान मिळाल्याचा आनंद

आळेकरांची वेगवेगळी नाटके रंगमंचावर पाहिली. ठकीशी संवाद हे अस्वस्थ करणारे गंभीर नाटक. त्याविषयी त्यांच्याशी बोलणेही झाले. मधल्या काळात कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा अध्यक्ष झाल्यावर जनस्थान कोणाला दिला जाणार, हा प्रश्न पडला. कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली बंद दाराआड झालेल्या चर्चेत आळेकरांचे नाव समोर आले. याचा आनंद वाटतो.

वसंत आबाजी डहाके (अध्यक्ष, कुसुमाग्रज प्रतिष्ठान)

Story img Loader