नाशिक: रविशंकर मार्गावरील गोदाम फोडून सुमारे दोन लाख रुपयांचे कपडे लंपास केल्याच्या प्रकरणात पाच महिलांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. संशयित महिला चोरलेले कपडे गंजमाळ झोपडपट्टीत विकत होत्या. याची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत संबंधितांना ताब्यात घेतले. शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा : नाशिक : रस्तादुरुस्तीसाठी सिन्नर-घोटी महामार्गावर आंदोलन

शहरात बाजारपेठांमध्ये चोरी, घरफोडीचे प्रकार घडत आहेत. रविशंकर मार्गावरील गोदाम फोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचे कपडे चोरून नेले होते. गोदामाच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून चोरटे आत शिरले. त्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरला. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर, संशयितांचा शोध घेण्याची सूचना पोलीस आयु्क्त संदीप कर्णिक यांनी केली होती. या अनुषंगाने गस्तीवर असताना पोलीस हवालदार विशाल काठे यांना गंजमाळ येथील भीमवाडी परिसरात पाच संशयित महिला चोरलेले कपडे झोपडपट्टी परिसरात विकत असल्याची गुप्त माहिती मिळाली. याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आदींच्या पथकाने गंजमाळ झोपडपट्टीत सापळा रचला. चोरीचे कपडे विकणाऱ्या पाच संशयित महिलांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. संशयित महिलांच्या ताब्यातून एक लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.