नाशिक : नाशिकरोड परिसरात दत्त मंदिर रस्त्यावर वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीवर मोक्कांतर्गत कठोर कारवाईची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. यातील फरार तिघांना घोटी आणि मालेगाव येथून पकडण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्या सात संशयितांना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. टवाळखोरांकडून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर, शहर पोलिसांनी आता रस्त्यावर उतरून कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली आहे.
विहितगाव येथील वाहनांची जाळपोळ व तोडफोडीच्या घटनेला चोवीस तासही उलटत नाही, तोच सोमवारी रात्री नाशिकरोडच्या दत्त मंदिर रस्त्यावरील धोंगडे मळा परिसरात पुन्हा तसाच प्रकार घडला. नऊ ते १० जणांच्या टोळक्याने एकाची लुटमार करीत कोयत्याने सहा ते सात वाहनांची तोडफोड केली. या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास चक्रे फिरवत अवघ्या काही तासात शुभम बहेनवाल उर्फ बाशी, रोशन उर्फ नेम्या पवार, सत्यम डेनवाल व मोईज शेख यांना अटक केली होती. त्यांची सायंकाळी उशिरा नाशिकरोड भागात वरात काढण्यात आली. दुसऱ्या दिवशी पोलिसांची शोध मोहीम सुरू होती. दुचाकीवर मुंबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या अमर वर्मा (१८, वंदे मातरम सोसायटी, जयभवानी रस्ता) आणि सुधांशू उर्फ सोनू बेद (१८, रामजी बिल्डिंग, फर्नांडिस वाडी) यांना पकडण्यात आले. तर रोहन खाडेला मालेगाव येथून ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या सर्व संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. धोंगडे मळ्यात वाहन तोडफोडीच्या प्रकरणातील संशयितांवर मोक्कांतर्गत कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा… नाशिकमधील कायदा- सुव्यवस्थेवर लक्षवेधी, भाजप आमदारांकडून गृहमंत्र्यांची भेट; छगन भुजबळ यांचे मौन
हेही वाचा… डीएड परीक्षार्थी विद्यार्थिनीला लघुशंकेसाठी न सोडल्याने त्रास, मालेगावातील प्रकार
सराईत गुन्हेगार शोध मोहीम आणि टवाळखोरांविरोधात शहर पोलिसांकडून नियमितपणे कारवाई सुरू आहे. अवैध धंदेही बंद केले गेले. काही समाजकंटक व टवाळखोरांमुळे शहराच्या शांततेला तडा जात आहे. ही बाब लक्षात घेऊन अवघी पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सायंकाळी आणि रात्री उशिरापर्यंत अनेक भागात टवाळखोर चौकात वा रस्त्यावर ठाण मांडतात. काही तिथेच मद्यपान करून गोंधळ घालतात. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या खाद्यपदार्थ गाड्या व पान टपऱ्यांवर वेगळे चित्र नसते. ही बाब लक्षात घेऊन सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत टवाळखोरांविरोधात धडक कारवाई केली जाणार आहे.